पुणे ः संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून, बारामती येथील एका भाविकाला कर्करोग बरा करून देतो, अशी बतावणी करून अडीच लाख रूपये घेऊन त्याची फसवणूककेल्याच्या आरोपाखाली मनोहर ऊर्फ मामा भोसले (वय 39, उंदरगांव ता. करमाळा, सोलापुर) यांना अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद गावच्या हद्दीमध्ये शुक्रवारी दुपारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, भोसले याचे दोन साथीदार विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे हे दोघे फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
बारामती तालुक्यातील एका युवकाने याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या वडीलांना कर्करोग झाला होता. त्यांनी अनेक रूग्णालयांमध्ये दाखवल्यानंतरही त्यावर उपचार न झाल्यामुळे तक्रारदार हे भोसले यांच्या बारामती येथील मठामध्ये गेले. त्याठिकाणी भोसले हे बाळूमामाचा अवतार असल्याचे त्यांनी तक्रारदार यांना सांगितले. तसेच, त्यांच्या गळ्यातील थायरॉईडचा कर्करोगदेखील बरा करतो असे सांगून, बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.
भोसले यांनी त्याचे साथीदार असलेल्या विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार पाचशे रूपये घेतले. तसेच, पैसे मागत असताना, तुझ्या वडीलांचे जिवाचे बरे वाईट होईल अशी भिती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. तक्रारदार यांनी पैसे परत मागितल्यानंतर त्यांना खूनाची धमकी दिली, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर बारामती पोलिसांचे पथक भोसले मामांचा कसून तपास करत होते. तसेच, करमाळा (सोलापूर) पोलिस ठाण्यात एका महिलेने भोसलेंविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यातदेखील सोलापूर ग्रामीण पोलिस भोसलेला शोधत होते. भोसले हे लोणंद परिसरात एका फार्महाऊसमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी भोसले यांना सापळा रचून ताब्यात घेतले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा