’सूर्यकोटी समप्रभ’अशा श्री गणेशाचा मंगलदायी उत्सव आज सुरु होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना होत आहे. सुखकर्त्या गणेशाचा हा उत्सवच चैतन्याने भारलेला असतो. संपूर्ण समाजातील मरगळ केवळ गजाननाच्या आगमनाने दूर होते. त्याच्या येण्याने शुभत्वाची सुरुवात होत असल्याने भारतीय संस्कृतीत या दैवताचे महत्त्व मोठे आहे. अमंगळाचा नाश करून सर्वत्र व सर्वांचे मंगल करणारा या अर्थाने गणेशास ’मंगलमूर्ती’ म्हटले जाते. परकीय सत्तेचे अमंगल जोखड दूर व्हावे, त्यासाठी भारतीय समाजातील सर्व गटांनी एकत्र यावे या हेतूने लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मांडली, आता हा उत्सव भारताच्या काना कोपर्‍यात; एवढेच नव्हे, तर साता समुद्रापार इंग्रजांच्या राज्यातही साजरा होत आहे. आबाल-वृद्धांना एकत्र आणणारा हा उत्सव आहे यात शंका नाही. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाच्या साथीचे ग्रहण त्यास लागले आहे. त्यामुळे नेहमीसारखा हा उत्सव साजरा करता येणार नाही. हा विषाणु अजूनही मानवासाठी गूढ आहे. तो सतत रूपे बदलत असल्याने त्याच्यावर अजून शंभर टक्के प्रभावी औषध सापडलेले नाही. मात्र ज्या लशी उपलब्ध आहेत त्या या विषाणूला रोखण्यास पुरेशा आहेत, हे लक्षात घेऊन सर्वांनी लशीकरण करून घेतले पाहिजे.
’गणराज्य’ धोक्यात
तिसर्‍या लाटेची शक्यता अजून कायम असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे हा महत्त्वाचा उपाय सर्वांनी अवलंबणे आवश्यक आहे. कोरोनाच्या उपद्रवाने देशच नव्हे तर जग गेली दीड वर्षे हतबल व हतबुद्ध झाले आहे. केवळ एक विषाणू व त्याने होणारा आजार असे या संकटाचे स्वरूप मर्यादित नाही. या विकाराने समाजाच्या सर्व क्षेत्रांवर आघात केला आहे. घरातील कर्ती माणसे दगावल्याने असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली, अनेक बालके अनाथ झाली त्यांचे अश्रु पुसण्याची जबाबदारी समाजावर आहे. टाळेबंदीमुळे कोट्यवधी व्यक्तींना रोजगार गमवावा लागला. त्यांना आधार देण्याची जबाबदारी देखील समाजाला उचलावी लागेल. ’मी आणि माझे घर सुरक्षित आहे, इतरांचे मला काय?’ हा विचार दूर केला पाहिजे. व्यापक देशहित व समाज हित यांचा विचार लोकमान्य टिळकांनी आयुष्यभर केला, तोच विचार आज प्रत्येक व्यक्तीने करण्याची गरज आहे. दरवर्षी या उत्सवात खर्च होणार्‍या रकमेतील थोडा भाग समाजासाठी दिला तर मोठी रक्क्कम उभी राहील. त्यातून अनेक मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत देता येईल, कोणास उपचारासाठी साहाय्य करता येईल. तीदेखील गणेशाची पूजाच ठरेल. सुमारे सवाशे वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीच्या काळात देशात दगडाच्या काळजाचे सरकार होते. ती परकीय सत्ता होती. आताही तसेच असंवेदनशील सरकार केंद्रात आहे. टाळेबंदीत गावाकडे परतू पाहणार्‍या अनेक स्त्री-पुरुष मजुरांना, लहानग्यांना प्राण गमवावे लागले; पण त्याची माहिती नसल्याचे या सरकारने सांगितले. अशा मजुरांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही सरकार तिकडे कानाडोळा करत आहे. भारत हे प्रजासत्ताक आहे, ’गणराज्य’ आहे, मात्र आज प्रजा हतबल झाल्याचे दिसते. सर्व घटकांना एकत्र आणण्याऐवजी समाजात फूट पाडण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरु आहेत. कधी धर्म, तर कधी कोणत्या समाजाचा आहार किंवा कोणाचा पोषाख, या वरून काही जणांना लक्ष्य केले जात आहे. हे कोण करत आहे हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे. तो छोट्या डोळ्यांनी सूक्ष्म निरीक्षण करण्यास सांगतो. मस्तकाचा-बुद्धीचा- वापर करून खरे आणि अपप्रचार यात ’नीर क्षीर विवेक बुद्धीने’ फरक करण्यास सांगतो. गणपतीच्या हातातील परशु समाजातील अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी आहे, स्वजनांना मारण्यासाठी नाही हे तो सुचवतो. तो ’गणाधीश’आहे, तो सर्व समावेशक विचारांचा आहे याचे भान ठेवून समाजाने कोत्या, संकुचित वृत्तीला स्थान देता कामा नये. वाढती महागाई, बेरोजगारी ही संकटेही कोरोनाच्या साथीच्या बरोबरीने समाजास त्रस्त करत आहेत. ती दूर करण्याची शक्ती समाजाने उभी केली पाहिजे. सर्व तर्‍हेची विघ्ने लवकर हरण करावीत ही श्री गणेशचरणी प्रार्थना.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा