संदेश जीवन विद्येचा ः वामनराव पै
आनंदासाठी हे सगळे चाललेले आहे असे म्हणतो तोपर्यंत हा आनंद हातात येणार नाही. जोपर्यंत मानवजात आनंदाचा शोध करते आहे तोपर्यंत हा आनंद हाताला लागणार नाही कारण आनंद हा शोधण्याचा विषयच नाही. माणूस आनंदाचा शोध करतो व आनंद मिळविण्यासाठी खूप पैसा पाहिजे. हे पाहिजे, ते पाहिजे व त्यासाठी खूप पैसा पाहिजे म्हणून सर्व लोक पैशाच्यामागे धावतात. पैशाच्या मागे धावून आनंद मिळतो की दुःख मिळते हे पैसेवाल्यांना जावून विचारा. तुम्हांला असे वाटते की पैसेवाले खूप आनंदात आहेत पण त्यांचे दुःख त्यांनाच ठावूक. पैसेवाल्यांना घरापासून धोका, मुलांपासून धोका, शेजार्‍यांपासून धोका, नातेवाईकांपासून धोका, दहशतवादयांपासून धोका, खंडणीवाल्यांपासून धोका, धोका अंगावर घेवूनच तो जीवन जगत असतो. चिंतेतच जीवन जगत असतो. तुम्ही आम्ही सहज आनंदाने जीवन जगतो. चिंता ही फार वाईट असते. चिंता, चित्‍ता व चिता अशा तीन गोष्टी आहेत. चित्‍ता म्हणजे वाघाची एक जात. तो माणसाला एकदाच खावून टाकतो. तोही मोकळा व माणूसही मोकळा. चिता म्हणजे अग्नी. अग्नी माणसाला एकदाच जाळून टाकतो. माणूसही मोकळा व अग्नीचेही काम झाले पण चिंता ही गोष्ट अशी आहे की ती माणसाला सतत जाळीत असते, सतत मारीत असते क्षणोक्षणी म्हणून चिंता ही सर्वात वाईट गोष्ट आहे. मानसिक ताणतणाव हयातून निर्माण होतात. आनंदाचा शोध करायला निघाला की पैशाच्यामागे लागतो व हयाच्या कपाळी शेवटी चिंता येते. चिंता व चिंतन असे दोन भाग आहेत. माणूस चिंता करण्यात पटाईत व सराईत आहे. चिंतन करायचे ते कुणाचे करायचे हे ठावूक नाही. चिंतन नको त्या गोष्टींचे करतो. भविष्याची चिंता करतो. भविष्यांत आमचे कसे होईल, मुलांचे कसे होईल ही चिंता माणसाला सतत जाळत असते. चिंता व चिंतन हयांत चिंतन वाईट गोष्टींचे असू शकते म्हणून चिंतन सुध्दा कुणाचे हे महत्वाचे आहे. काय नोहे केले, एका चिंतीता विठ्ठले सर्व साधनांचे सार, भवसिंधु उतरी पार योग याग तपें, केली तयानें अमुपें तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा काय नोहे केले? तुम्ही जर देवाचे चिंतन केले तर काय होणार नाही? तुम्हांला पाहिजे ते मिळेल. देवाचे चिंतन सतत केले पाहिजे. सायंटिस्टनी मोठमोठे शोध लावले त्यात त्यांनी काय केले? चिंतन केले. सगळया सायंटिस्टनी किती शोध लावले त्याने मानवजातीला खूप फायदाही झाला व खूप नुकसानही झाले. विज्ञानाने चांगल्या गोष्टी केल्या तशा वाईटही गोष्टी निर्माण झाल्या. आज मानवजात विनाशाच्या उंबरठयावर उभी आहे त्याचे कारण विज्ञान तसेच आज मानवजातीला ज्या सुविधा मिळत आहेत त्याचेही कारण विज्ञान! दोन्ही खरेच आहे.
(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा