पुणे : सलग दुसर्‍या वर्षी कोरोना संसर्गाचे भान राखत मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा गणेशोत्सवाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा अतिशय साध्या पद्धतीने शुक्रवारी करण्यात आली. मोजकेच पदाधिकारी उपस्थित असले, तरी नगारा वादन आणि सनईच्या मंगलमय सुरावटीने टिळक वाड्यात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
प्रथेप्रमाणे रमणबाग चौकातील महेश गोखले व विध्देश गोखले (गोखले गुरुजी) यांच्याकडून ‘श्रीं’ची मूर्ती घेण्यात आली. पालखीत बाप्पा विराजमान झाल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात पालखीतील बाप्पाचे टिळक वाड्यात आगमन झाले. त्यानंतर सकाळी 10.30 च्या सुमाराला केसरी गणेशोत्सवाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक व केसरीच्या विश्‍वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी ‘केसरी’चे विश्‍वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, ‘केसरी’च्या विश्‍वस्त-व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, ‘केसरी’चे कार्यकारी संपादक निखिल गजेंद्रगडकर, ‘केसरी’च्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रताप बिडवे व महादेव तुपे यांनी नगारा वादन केले. पालखीत विराजमान झालेल्या गणरायाचे टिळक वाड्यात आगमन होताच चैतन्यमय वातावरणात भरच पडली. डॉ. प्रणती रोहित टिळक यांनी गणरायाचे औक्षण केले. त्यानंतर ‘श्रीं’ची गणेश मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. कौस्तुभ खळीकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा