तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह यांचे प्रतिपादन
काबूल :
अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान आता सत्ता स्थापनेची तयारी करत आहे; पण आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले अफगणिस्तानमधील सरकार चालवण्यासाठी तालिबानकडे पैसेच नाहीत. याचाच गैरफायदा घेत चीनने तालिबानशी जवळीक साधली असून चीनच्या मदतीने अफगाणिस्तानमधील आर्थिक संकटाचे निराकरण करू, असे तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहीद यांनी म्हटले आहे. जगातील मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी चीन हा आमचा एन्ट्री पास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
इटलीतील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले असून तालिबानच्या मागे पाकिस्तानबरोबर चीनही ठामपणे उभे असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी अफगाणिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवली आहे. यामुळे चीनने तालिबानशी जवळीक साधली आहे. अफगाणिस्तानमध्ये गुंतवणुकीसही चीनने उत्सुकता दाखवली असून येत्या काही काळात चीन अफगाणिस्तानमधील मुख्य गुंतवणूकदार होईल, असे जबीउल्लाह यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तानमध्ये तांब्याच्या खाणी आहेत. त्यांच्या आधुनिकीकरणासाठी चीनने स्वारस्य दाखवले आहे. यामुळे जगातील मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी चीन हा आमचा एन्ट्री पास असल्याचेही जबीउल्लाहने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा