नवी दिल्ली : एखाद्या चित्रपटांमध्ये शोभेल अशी घटना इस्रायलमध्ये घडली. इस्रायलमधील अतिशय सुरक्षित समजल्या जाणार्‍या कारागृहातून चमच्याने भुयार खोदून गंभीर गुन्ह्यांतील सहा कैदी पळून गेले. या घटनेमुळे इस्रायली अधिकार्‍यांवर टीका होत आहे.
उत्तर इस्रायलमधील गिलबोआ तुरुंगातून पळून गेलेले सर्व सहा कैदी एकाच कोठडीत कैद होते. यापैकी पाच इस्लामिक जिहाद संघटनेशी संबंधित आहेत आणि झकारिया जुबैदी हा पश्चिम किनारपट्टीच्या जेनिन शहरातील अल-अक्सा शहीद ब्रिगेडचा माजी कमांडर आहे. या ब्रिगेडने 2000 ते 2005 या कालावधीत इस्रायली लोकांवर प्राणघातक हल्ले केले होते. उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगातून सुटण्यासाठी कैद्यांनी बाथरूममध्ये सिंकखाली एक भुयार खोदले. गंजलेल्या चमच्यांच्या मदतीने अनेक दिवसांच्या प्रयत्नातून त्यांनी भुयार खोदले. हे कैदी एक एक करून येत आणि भुयार खोदत. कैद्यांनी अत्यंत हुशारीने आणि शांततेत हे काम केले.
कैद्यांनी बाथरूममधून खोदलेेले भुयार तुरुंगाच्या बाहेर उघडले आणि सोमवारी कैद्यांनी या भुयारातून तुरुंगाबाहेर पळ काढला. पोलिसांनी यासंदर्भात दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कैद्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. ते आता जवळील इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँक प्रदेशात पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात. सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि मोठ्या संख्येने पोलीस दल त्यांचा शोध घेत आहेत. याशिवाय 400 कैद्यांना दुसर्‍या ठिकाणी हलवण्यात आले आहे.
इस्लामिक जिहाद, हमासकडून आनंद व्यक्त
इस्लामिक जिहादने या घटनेबद्दल आनंद व्यक्त केला. तर, हमासचा प्रवक्ता फावदी बारहौम म्हणाला की, हा मोठा विजय आहे, ही इस्रायली तुरुंगातील आमच्या शूर सैनिकांची इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाचा पुरावा देणारी घटना आहे. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा