मंचर, (वार्ताहर) : राज्यातील विविध निवडणुकांमध्ये धनाढ्य लोकांला फाटक्या शिवसैनिकांनी टक्कर दिली. नारायण राणे, गणेश नाईक यांना फाटक्या शिवसैनिकांनीच पराभूत केले. पैशांनी निवडणुक जिंकता आली असती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 50 खासदार निवडुन आले असते. असा टोला शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते शनिवारी वडगांव काशिंबेग येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी हा आपला सत्तेतील भागीदार आहे. व सत्तेतील भागीदार हाच खरा विरोधक असतो. असे असले तरी आपण राष्ट्रवादी पक्षासोबत सत्तेत आहोत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा अधिक विचार न करता आपला राज्यातील प्रमुख विरोधक व शत्रु भाजप आहे. त्याविरोधात शिवसैनिकांनी संघर्ष करावा. स्व. किसनराव बाणखेले यांनी रामकृष्ण मोरे यांचा पराभव केला. लोकवर्गणीतुन किसनराव बाणखेले जिंकले. ‘धोतर गेलं दिल्लीला‘ ही म्हण किसनराव बाणखेले यांच्यामुळे राज्यामध्ये पोहचली. राज्यसरकार कोणाचे आहे. याची पर्वा शिवसैनिकांनी करु नये.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, मी जरी खासदार नसलो तरी खासदार होतो तेवढीच ताकद शासन दरबारी आहे. शिवसेना पक्ष पाठीशी आहे. कुठलीच कामे अडत नाहीत. एखाद्या निवडणुकीत पराभव झाला म्हणजे सर्वकाही संपणे असे नाही. त्यातुन शिकायचे आहे. तालुक्यातील निवडणुकीत पैशाची ताकद समोरच्यांकडे आहे. महाविकास आघाडी बरोबर आयुष्यभर बरोबर राहू. शेवटी पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आघाडीबाबत वरिष्ठांचा आदेश आला तर ठिक अन्यथा स्वतंत्र लढण्याच्या तयारीला लागा. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, उपनेते रविंद्र मिर्लेकर, माजी आमदार शरद सोनवणे, अविनाश रहाणे, सुनिल बाणखेले, रविंद्र करंजखेले, देविदास दरेकर, राजाराम बाणखेले, दत्ता गांजाळे, शितल तोडकर, सरपंच किरण राजगुरु आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश घुले यांनी केले. आभार देविदास दरेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा