परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वराचे रूप काय? परमेश्वराचे स्वरूप काय? परमेश्वराचा व आपला संबंध काय? परमेश्वराचा व जगाचा संबंध काय? परमेश्वराचे आपल्या जीवनांत स्थान काय? परमेश्वर आपल्यासाठी काय करतो? परमेश्वर कसे करतो? का करतो? हा सर्व विषय पाहिला तर आपल्या ध्यानांत येईल की परमेश्वर हा अत्यंत जिव्हाळयाचा विषय आहे. दुर्देवाने परमेश्वर या विषयाकडे माणसे फक्त अध्यात्म या दृष्टीने पहातात. आध्यात्मिक लोक त्याचा विचार करतात व सांसरिक लोक त्याची कृपा व्हावी, कोप टाळावा एवढाच विचार करतात. बाकीचे लोक परमेश्वर आहे तो ठीक आहे असे म्हणतात. तो आहे की नाही हे आम्हांला माहित नाही असेही म्हणतात. सांगायचा मुद्दा परमेश्वर हा विषय समजला नाहीतर हे जग सुखी होणे शक्य नाही हा जीवनविद्येचा सिध्दांत आहे. आज काय परिस्थिती आहे, इतिहासकालापासून ते आजपर्यंत, पुरातनकाळापासून ते आजतागायत जग सुखी झालेले नाही. जग सुखी व्हावे म्हणून लोकांनी अवतार घेतले. देवांचे अवतार झाले. रामावतार, कृष्णावतार असे अनेक अवतार झाले. हे कशासाठी घेतले? जगाला सुखी करण्यासाठी हे अवतार घेतले. इतके अवतार होवूनसुध्दा काय झाले? जग जिथे आहे तिथेच आहे. जग जिथे होते तिथेच आहे. पुर्वीच्या काळापेक्षा आज परिस्थिती कठीण आहे. त्यांत काही फरक पडलेला नाही. जग सुखी होण्याऐवजी दुःखीच झालेले आहे. मी नेहमी सांगत असतो. पुरातन काळापासून आजपर्यंत परमेश्वराचा जसा विचार व्हायला पाहिजे होता तसा झालेला नाही म्हणून ही परिस्थिती ओढवलेली आहे; पण आज जेव्हा सांगायला जातो तेव्हा लोकांचा मेंदू किंवा लोकांची मने इतकी संकुचित झालेली आहेत. धर्मामुळे, जातीमुळे संकुचित झालेली आहेत. पंथामुळे, संप्रदायामुळे संकुचित झालेली आहेत. या सगळयांमुळे बुध्दी संकुचित झालेली आहे. याचा परिणाम भांडणतंटे अधिक झाले. युध्दलढाया अधिक झाले. जीवनविद्येने याचा पूर्ण विचार केला व यावर तोडगा काढला पाहिजे असे ठरविले. तोडगा काढला नाहीतर हे असेच चालत रहाणार. आम्ही जे सांगतो ते लोकांना चटकन पटते असे नाही कारण लोकांचा मेंदू हा चुकीच्या संकल्पनामध्ये गुंतलेला आहे. द्वैतअद्वैत, विशेष द्वेैत, विशेषअद्वैत, शुध्द द्वैत, शुध्द अद्वैत हया अनेक गोष्टींमध्ये लोक गुंतलेले होते व अजुनही आहेत. जीवनविद्या सांगते परमेश्वर ज्याला म्हणतात तो परमेश्वर व आपण समजतो तो परमेश्वर यांत जमिनअस्मानाइतके अंतर आहेे. लोक आज परमेश्वर म्हटले की मूर्तीकडे जातात. लोकांच्या डोळयासमोर निरनिराळे देव येतात. जे मूर्ती मानत नाहीत त्यांच्या डोळयासमोर काहीच येत नाही. ते काहीतरी कल्पना करतात की कुठेतरी काहीतरी आहे व त्याला ते काहीतरी नांव देतात म्हणजे शेवटी ते कल्पनाच करतात.
(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा