पेशवे यांच्या वारसदारांची मागणी
पुणे : अफाट कर्तृत्व गाजविलेल्या बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, तसेच मेट्रो स्थानकाला श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे नाव द्यावे. अशी मागणी पेशवे यांच्या वारसदारांनी बुधवारी केली.
पुणे महापालिका, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 321 व्या जयंतीनिमित्त महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शनिवारवाडा येथील बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपमहापौर सुनीता वाडेकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, पेशव्यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा आणि कुटुंबीय, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अनिल गानू, सचिव कुंदनकुमार साठे, महापालिकेचे सहायक आयुक्त आशिष महाडदळकर उपस्थित होते.
शनिवारवाड्याची दुरवस्था झाल्याने राज्य व केंद्र सरकारने जीर्णोद्धारासाठी निधी द्यावा आणि शनिवारवाडा परिसरातील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावी, असेही पेशवे यांचे वारसदार व माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मागणी केली.
शैलेश जोशी लिखित ‘शिवशाहीचा उत्तरार्ध अर्थात पेशवाईचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ब्राह्मण महासंघातर्फे लालमहाल ते शनिवारवाडा या दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. बँड पथकसह, पारंपरिक वेशभूषेत फुगडी खेळणार्‍या महिला व बाजीरावांच्या वेशातील चिमुकला गणेश दवे यांनी लक्ष वेधून घेतले.
थोरले बाजीरावांना अभिवादन करण्यासाठी पुतळ्यापर्यंत जाता येत नाही. अनेकदा मागणी करूनही येथे जिना उभारण्यात आलेला नाही. महापालिकेने त्वरित जिना उभारावा, अशी मागणी करण्यात आली. ‘अफाट कर्तृत्व गाजवलेल्या बाजीराव पेशवा यांच्या स्मृती व वैभवशाली इतिहास जतन करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल. येत्या आठ दिवसांत आवश्यक परवानगी मिळवून पुतळ्यापाशी कायमस्वरूपी शिडी उभारण्यात येईल, असे आश्वासन महापौर मोहोळ यांनी दिले.

दरवर्षी पेशवा जयंती साजरी करणार
ब्राह्मण महासंघाच्या वतीने दरवर्षी शिव जयंती, शिव राज्याभिषेक दिवस, दिल्ली विजय दिवस साजरा करण्यात येतो. यंदापासून थोरले बाजीराव पेशवे यांची दरवर्षी मोठ्या स्वरूपात जयंती साजरी केली जाणार आहे. यावेळी कोरोनामुळे मर्यादा होती. मात्र परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर या जयंतीचे स्वरूप मोठे असणार असल्याची माहिती ब्राह्मण महासंघाचे संस्थापक आनंद दवे यांनी दिली.

शनिवारवाड्याकडून पराक्रमाची स्फूर्ती

थोरले बाजीराव पेशवे हे 48 पेक्षा जास्त लढाया जिंकलेले जगातील एकमेव सेनापती होते. उत्तर हिंदुस्थानात दरारा निर्माण करणारे ते योद्धे होते. त्याकाळी मराठ्यांनी पानिपतमध्ये रक्त सांडले म्हणून आजचा भारत आहे. शनिवारवाडा मराठ्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती देत आहे. – मोहन शेटे, इतिहास अभ्यासक.

   


प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा