पुणे : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे.

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातील आणि अभियांत्रिकीमधली पदवी एकाच वर्षी मिळवली होती. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले होते.

बालाजी तांबे यांनी २००३ पासून संपादित केलेली फॅमिली डॉक्टर नावाची पुरवणी पुण्याच्या दैनिक सकाळबरोबर दर शुक्रवारी प्रकाशित होत होती. साम या मराठी दूरचित्रवाहिनीवर त्यांचे आठवडाभर रोज भगवद्‌गीता या विषयावर प्रवचन होत होते. ’गीता योग’ या नावाने ही प्रवचने २०११ पासून सुरू होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा