पुणे ः ऐतिहासिक वास्तू म्हणून पुणे रेल्वे स्थानक इमारतीची ओळख आहे. ही इमारत ब्रिटिशकालीन असून मंगळवारी ही इमारत 97 वर्षांत पदार्पण करीत आहे. प्रवाशांना मायेची सावली देणार्‍या या इमारतीविषयी कृतज्ञता म्हणून रेल्वे प्रवासी संघातर्फे या इमारतीचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
या इमारतीचा पहिला आराखडा 1915 मध्ये तयार करण्यात आला. या वास्तूचे काम अर्किटेक पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. 1925 मध्ये या इमारतीचे काम पूर्ण झाले. या स्थानकाचा उद्घाटन सोहळा मुंबईचे गर्व्हनर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत पार पडला होता. या उद्घाटन समारंभासाठी मुंबईहून एक विशेष रेल्वे गाडी पुण्याला आणण्यात आली होती.
पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम 4472.38 मीटर आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 5 लाख 79 हजार 665 रूपये खर्च झाला होता. एक क्रमाकांच्या फलाटाची लांबी 310 मीटर व रूंदी 13 मीटर आहे. त्यावर 13 डब्याची गाडी उभी राहते. या रेल्वे स्थानकाला 20 वर्षांपूर्वी आदर्श रेल्वे स्थानक म्हणून गौरविण्यात आले. तसेच या वास्तूला ऐतिहासिक दर्जा प्राप्त आहे. आशिया खंडातील पहिली डबल डेकर सिंहगड एक्सप्रेस व डेक्कन क्विनच्या डायनिंग कारची लिम्का बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली आहे. या रेल्वे स्थानकावरून 5 लाखापेक्षा जास्त प्रवासी ये-जा करतात. लेकल, मेन लाईनच्या गाड्या, मालगाड्या अशा रोज 250 गाड्या धावतात. विशेष गाड्याही पुणे रेल्वे स्थानकातून धावण्यास सुरूवात झाली आहे.

कृतज्ञता सोहळा
पुणे रेल्वे स्थानकाची मुख्य इमारत मंगळवारी 97 व्या वर्षांत पर्दापण करत आहे. प्रवाशांना वर्षानुवर्षे सावली देणार्‍या स्थानकाच्या इमारतीविषयी कृतज्ञता म्हणून या इमारतीचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसाचा सोहळा याच इमारतीत पार पडणार आहे. केक कापून इमारतीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. – हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी संघ.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा