पुणे : राज्यात कठोर निर्बंधांच्या नावाखाली राज्य सरकारने नागरिकांना लॉकडाऊनमध्ये अडकविले आहे. या निर्णयांविरोधात संतापाची लाट असून, याविरोधात सामान्य जनता कोणत्याही क्षणी बंड करू शकते. हे बंड सुरू होण्याआधीच सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्हालाही यात सामील व्हावे लागेल, असा इशारा वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
पुण्यात बुधवारी पत्रकार परिषदेत डॉ. आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर कठोर निर्बंधांच्या नावाखाली केलेल्या लॉकडाऊनबाबत सरकारवर सडकून टीका केली.
ते म्हणाले, अनेक लोकांचे हातावर पोट आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर जनतेने, व्यावसायिकांनी आर्थिक संकटातून सावरण्यास सुरवात केली नाही तोच पुन्हा कठोर निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊन करण्यात आले. एकीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्याच्या कोरोनापासून प्रादुर्भाव कमी होत असून, पहिल्यापेक्षा तीव्र नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेत आहे. धार्मिक स्थळेदेखील बंद केली असून, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर देवस्थानाबाहेर बसणार्या किरकोळ व्यावसायिकांवर भिक्षा मागण्याची वेळ आली आहे. दुकानदार ऐकण्याच्या तयारी नाहीत. त्यांनी दुकाने उघडली, बंड केले तर आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत. त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी हरकत नाही, अशा स्पष्ट शब्दात डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला इशारा दिला.
भाजप आमची कॉपी करतेय
राज्यात पुन्हा लॉकडाऊन नको, ही भूमिका प्रथम वंचित बहुजन विकास आघाडीने मांडली होती. त्यामुळे भाजप तीच री पुढे ओढत असून, भाजप आमचीच कॉपी करत आहे.
राज्यातील प्रकरणे दाबण्यासाठी कोरोना
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात राजकीय, आर्थिक अस्थिरता आहे. राज्याच्या राजकारणात उलथापालथ होत असून, मंत्र्यांवर अधिकारी आरोप करत आहे. परमबीरसिंह यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले असून, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणावरून विषयांतर करण्यासाठी, नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी मुद्दाम कोरोना प्रादुर्भाव वाढवल्याचा संशय येत आहे. कारण पश्चिम बंगालसारख्या ठिकाणी निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून, प्रचंड मोठ्या सभा होत आहेत. या सभेत पंतप्रधान विनामास्क सभा घेत आहेत, असा टोला डॉ. आंबेडकर यांनी लगावला.