पुणे : कोरोना संकटामुळे बहुतांश घटकांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. याची झळा नृत्य कलाकारांनाही बसली आहे. सुमारे दीड वर्षापासून या कलाकारांची कामे बंद झाली आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या नृत्य कलाकारांची अवस्था मरणासन्न झाली आहे.
शास्त्रीय नृत्य, लोककलावंत आणि पाश्चात्य नृत्य करणार्‍यांची पुण्यासह राज्यातील संख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. हे सर्व नृत्य कलाकार अंगभूत कलेच्या जोरावर जीवन जगतात. टीव्हीवरील अनेक कार्यक्रम याच गुणवान कलाकारांच्या जोरावर सर्वाधिक टीआरपी मिळवून कोट्यवधी रुपये कमावत आहेत. मुळात यातील अनेक कलाकरांचे शिक्षण कमी असते. यातील काही कलाकार नृत्याचे वर्ग घेतात. त्यातून मिळणारे उत्पन्न कमी आहे, तर जागेसाठी मोजावे लागणारे भाडे अधिक आहे. राज्यभरात 10 ते 12 लाख विद्यार्थी नृत्याचे प्रशिक्षण घेतात. त्यामुळे नृत्य वर्ग हे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत उपजीविकेचे एक नवे साधन बनले आहे. मात्र हे साधन बंद झाल्याने नृत्य कलाकारांचे जगणे कठीण झाले आहे.
शालेय स्नेहसंमेलन, स्पर्धा, चॅनेल चे कार्यक्रम, व्यवसायिक इवेंट्स आणि लग्नसमारंभातील संगीत अशा अनेक माध्यमातून हा व्यवसाय महाराष्ट्रात उदयास येऊ लागला असतानाच कोरोनामुळे हे क्षेत्र ठप्प झाले आहे. त्यामुळे या कलाकारांचे जगणे दुरापास्त बनलेे आहे. नृत्य वर्गावर अवलंबून असणार्‍या पन्नास टक्क्यांहून अधिक कलाकारांची घरे स्वतःची नाहीत. त्यामुळे घरभाडे, किराणा, मुलांचे शिक्षण, कर्जे आणि हप्त्यामुळे या व्यवसायावर निर्भर असणारे हे कलाकार आता रस्त्यावर आले आहेत. मात्र दीड वर्षात सामाजिक संस्था, नगरसेवक, आमदार, खासदार आणि सरकार यापैकी कोणीच मदत केली नसल्याचे नटरंग अकादमीचे जतिन पांडे आणि रत्नाकर शेळके डान्स अ‍ॅडमीचे रत्नाकर शेळके यांनी सांगितले.

शासनानी मदत करावी
नृत्य ही कला महाराष्ट्राच्या लोककलेतील एक प्रमुख कला आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातील नृत्य कलाकार शासनाकडे मदतीसाठी आस लावून बसला आहे. फक्त आठवड्यातून दोन दिवस फक्त दोन तास तरी नृत्याचे वर्ग घेण्याची परवानगी द्या. नृत्य कलाकारांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुलांच्या फी भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. या कठीण परिस्थितीतून नृत्य कलाकारांना बाहेर काढण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा