पुणे : शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४५ हजारांवर पोहोचली आहे. सर्वांनाच रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासते असे नाही. मात्र, त्या तुलनेत केवळ 4 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन बाजारात उपलब्ध आहेत. खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाने इंजेक्शनची उपलब्धता व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रेमडेसिवीरची 12 हजार इंजेक्शन आज (गुरुवारी) शहरात येण्याची शक्यता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी वर्तविली आहे.

शहरात कोरोना रुग्णसंख्येबरोबरच गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. गंभीर रुग्णांसाठी डॉक्टरांकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचा पर्याय अवलंबण्यात येत आहे. एका रुग्णाला सहा इंजेक्शन देण्यात येतात.

या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की रेमडेसिवीर इंजेक्शन व अन्य औषधांच्या उपलब्धतेसाठी महापालिका अन्न व औषध प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. सध्या शहरात 4 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असून, एक-दोन दिवसांत आणखी 12 हजार इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे इंजेक्शन देण्यात येत आहेत.दरम्यान, आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी महापालिकादेखील रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी निविदा राबविणार असल्याचे सांगितले.

देशात रेमडेसिवीर उत्पादन करणार्‍या चार कंपन्या आहेत. त्यापैकी एका कंपनीने या इंजेक्शनचे उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत इंजेक्शन पुरवठा साखळीत अडथळे येत आहेत. मात्र, उर्वरित तीनही कंपन्यांनी उत्पादन क्षमता वाढविण्यास सुरुवात केली असून, येत्या काळात रेमडेसिवीरचा तुटवडा भासणार नाही, अशी आशा एका वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍याने व्यक्त केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा