पुणे : गृहविलगीकरणात असतानादेखील बाहेर पडणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांना चाप बसविण्याचा प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे बॉण्ड (बंधपत्र) लिहून घेतल्यानंतरच त्यांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाणार आहे. क्वारंटाईन काळात बाहेेर आढळल्यास त्या रुग्णाकडून पंचवीस हजार रुपये वसूल केले जाणार आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शहरांत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ४५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. यापैकी, सुमारे ३८ हजार ४०१ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर ६ हजार ४२१ रुग्ण रुग्णालयात आणि कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहे. सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जाते. मात्र, त्यांनी नियमांचे पालन केले नाही; तर, या रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याचा धोका अधिक आहे. या रुग्णांनी गृहविलगीकरणात असताना काय काळजी घ्यावी? याची नियमावली आहे. पहिल्या लाटेत वस्ती भागात कोरोनाबाधित रुग्ण जास्त आढळून आले होते.

अमरावती महापालिकेने गृहविलगीकरणात राहण्याची इच्छा असणार्‍या रुग्णांकडून पंचवीस हजारांचे बंधपत्र लिहून घेतले जाते. क्वारंटाईन कालावधीत संबंधित रुग्ण घराबाहेर पडला, तर त्याच्याकडून बंधपत्राप्रमाणे पंचवीस हजार वसूल करण्यात येत आहे. याप्रकारे अमरावती महापालिकेने पाच ते सहा जणांवर कारवाई केली असल्याची माहिती पुणे महापालिका प्रशासनाला मिळाली आहे. बंधपत्रामुळे गृह विलगीकरणातील रुग्ण बाहेर पडत नसल्याचा अनुभव तेथील प्रशासनाला आल्याचा दावा केला जात आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा