संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै

बहुतांशी दुःखी होणे सोपे सुखी होणे कठीण असे होते त्याचे कारण असे की आपल्याला जीवन जगायचे कसे हे कळलेलेच नाही. जीवन जगणे ही एक कला आहे व ही कला हस्तगत केली पाहिजे. भक्ती व युक्ती यांची युती होते तेव्हा जीवनांत शांती मिळते, मुक्ती मिळते, सर्व काही प्राप्त होते म्हणून भक्ती व युक्ती या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. परमार्थात भक्ती पाहिजे व संसारात युक्ती पाहिजे. आम्ही जीवनविद्या मिशनमध्ये या दोन गोष्टी सगळयांना शिकविता. परमार्थात भक्ती कशी करायची हे एक व संसारात युक्तीने कसे रहायचे हे दुसरे. जीवनविद्या मिशनमध्ये आलेले लोक अपवाद सोडले तर बहुतेक लोक सुखी झालेले आहेत. याचे कारण परमार्थात भक्ती कशी करायची हे एक व संसारात युक्तीने कसे रहायचे हे दुसरे त्यांना इथे शिकविले जाते. देवाची भक्ती करायची म्हणजे काय हेच लोकांना ठावूक नाही. देव म्हणजे काय? देवाची भक्ती करायची म्हणजे नेमके काय करायचे हे ठावूक नाही व याचा परिणाम असा होतो की देवाची भक्ती करतो असे आपण समजतो; पण ती देवाची भक्ती नसते. खूप कर्मकांडे केली म्हणजे खूप भक्ती केली असे आपल्याला वाटते; पण ते चुकीचे असते. कर्मकांडे आणि देवाची भक्ती व देव यांचा कसलाही संबंध नाही। कर्मकांडे करणारा माणूस देवापासून दूर असतो. दूर गेलेला आहे असे म्हणायला तो कधीतरी जवळ असावा लागतो; पण कर्मकांडे करणारा माणूस देवाच्या जवळ नसतो तर तो देवापासून दूर असतो. कर्मकांडे करता करता तो कर्मठ होतो. पूजा अशीच करायची, असेच झाले पाहिजे, तसेच झाले पाहिजे असे म्हणताना तो देवापासून दूरच रहातो. मला असे अनेक लोक माहित आहेत की पूजा करताना त्यांची पुजा कशी चालते. हा गृहस्थ पूजेला बसायचा व पूजेचे काहीतरी राहून गेले हा इतका रागावयचा, बायकोकडून एखादे दिवस गंध उगाळायचे राहून गेले तर तिच्या आई-वडिलांचा उद्धार करायचा. दोन-दोन तास सासू पूजा करते व पूजा झाल्यावर सुनेला रागावते मग ही कसली पूजा? कर्मकांडे जे करतात ते कर्मकांडांत अडकतात. ते केले नाहीतर पाप लागेल. पाप लागेल म्हणजे देवाचा कोप होईल. देवाचा कोप होणार म्हणजे जीवनांत संकटे आलीच. अशा तर्‍हेच्या भानगडी निर्माण कर्मकांडे करणारा मनुष्य कर्मकांडांत अडकतो. जसा रेशमी किडा असतो तो स्वतःच्या पोटातून रेशीम तयार करतो व त्या कोशात स्वतःच अडकतो तसेच कर्मकांडे करणारी माणसे त्या कर्मकांडांत अडकतात व इतकी अडकतात की घरच्या लोकांना ती तापदायक होतात व स्वतःचेही दुःख निर्माण करतात.

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा