ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे

कोरोनाच्या काळात शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडून ठेवण्याकरीता ऑनलाईन वर्ग सुरू ठेवण्यात आले; पण याच काळात परीक्षा घेण्याचा विचार पुढे येताच विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्याच बरोबर विद्यार्थ्यांची लेखन क्षमता, वेग कमी झाल्याचे सांगण्यात आले. घरी बसून विद्यार्थी शिकत असल्यामुळे विद्यार्थ्यांना लेखनाची संधी फारशी मिळाली नाही. शिक्षकांनी संधी उपलब्ध करून दिली असली तरी विद्यार्थ्यांना लेखनाची अभिरूची नसल्याने त्यांनी ती वाट चोखाळली नसेल. त्यामुळे या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. लेखन करावे न वाटणे हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि सुस्पष्ट विचार प्रक्रियेत अडथळा ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे विद्यार्थी लिहीत नाही हे मान्य केले तरी मुलांना लेखनाचे स्वातंत्र्य आणि लेखनाची सृजनशील वाट निर्माण करून दिली तर बरेच काही हाती लागण्याची शक्यता आहे. मात्र आज कोरोनाच्या परिस्थितीने जो धोका निर्माण झाला आहे..तो भविष्यात कायम राहिला तर विचार करण्याच्या प्रक्रियेला देखील धक्का बसेल.

विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि लेखन यांचे एक नाते आहे. अभ्यास करणे म्हणजे लेखन करणे असा जणू समज आहे. शाळेतून विद्यार्थी घरी गेला आणि त्यांने त्यादिवशी कोणत्याच प्रकारे लेखन केले नाही तर पालक त्याला सहजपणे विचारतात आज काही अभ्यास नाही का..? लेखन हा अभ्यासच आहे हीच मुळ धारणा आहे. सध्या लेखनाचा सराव कमी झाला आहे हे तत्वतः स्वीकारावे लागेल. कधीकाळी शाळेत पाटी पेन्सिल असायची तेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत होते. आज पाटी पेन्सिल शाळांमधून जणू हददपार झाली आहे. पहिलीपासूनच वही पेन हाती आले आहेत.

त्याच बरोबर सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोठया माणंसाना देखील हातांने लेखनाची गरज वाटत नाही. हातात असणारा मोबाइल, हाती असणारे संगणक यांच्या मदतीने लिहिले जाते. त्याच बरोबर अलीकडच्या काळात तेथेही टाइपिंग करण्याची गरज नाही. ध्वनिउच्चाराच्या साहाय्याने लेखन करणे सुलभ होत असल्यांने अऩेक जण त्याचा वापर करीत आहे; पण हे देखील एकप्रकारे लेखनच आहे. समर्थांनी दिसामाजी काही लिहीत जावे. दिसामाजी काही वाचीत जावे. अशा अर्थाचे सुवचन नमूद केले आहे. त्या वचनातून लेखनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. विद्यार्थी जेव्हा लेखन करीत असतो तेव्हा त्या मागे त्याची एक विचार प्रक्रिया असते. अऩेकदा बोलतांना व्यक्ती जितक्या सहजतेने संवाद साधते त्यापेक्षा अधिक विचार लेखन करताना डोकावलेला आपणास पाहावयास मिळतो. लिहितांना एक प्रकारे विचार प्रक्रिया घडत असते. लिहितांना आपला मेंदू अधिक विचार करीत असतो. लिहितांना मेंदू वापरला गेला तरच लिहिण्यात आनंद मिळत असतो. लिहिण्यातून आपल्या विचाराला मोकळी वाट सापडत असते. लेखन ही एक प्रकारची स्वअभिव्यक्ती आहे. लेखनाच्या प्रक्रियेतून व्यक्ती तणावमुक्त होत असते. मात्र ते लेखन स्वतंत्र असायला हवे इतकेच. लेखनातून आऩंद मिळत असेल तर शाळा, महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी लेखन अवघड का ठरते? त्याचे कारण कोणतीही गोष्ट आपणाला शिकायची असेल तर त्या करीता त्यातून आऩंद मिळायला हवा. ज्यात आऩंद नाही त्या गोष्टी फार तर सक्ती म्हणून केल्या जात असतात. विद्यार्थी सक्तीने ती प्रक्रिया पूर्ण करतात मात्र त्यात शिकण्याचा आनंद गमावून बसतात हे लक्षात घ्यायला हवे.

साधारणपणे प्राथमिक स्तरावर आरंभी अऩुलेखनावरती भर असतो. त्यानुसार पाहून लिहिणे व्हावे अशी अपेक्षा असते. अऩेकदा गृहपाठ, वर्गपाठ, तर कधी कधी शिक्षा म्हणून विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगण्यात येते. अऩेकदा पुस्तकाखालील प्रश्नोत्तरे लिहावी लागतात. यात कधी कधी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे भाग पाडले जाते. शिक्षकांच्या दृष्टीने सराव व्हावा म्हणून पुन्हा पुन्हा लिहिण्यास सांगितले जात असले तरी त्यातून फार काही बदल होतांना दिसत नाही. विशेषतः शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर ज्या इयत्ता महत्वाच्या असतात त्या स्तरावर तर हे लेखन म्हणजे विद्यार्थ्यांना नको नको होऊन जाते. वर्गपाठाच्या वहीतही लिहिलेच गृहपाठाच्या वहीत लिहा. कधीकधी महत्वाचे आहे. परीक्षेसाठी येईल म्हणून पुन्हा स्वतंत्र वहीत लिहा असे अऩेक प्रकार होत असतात. यात हेतु प्रामाणिक असला तरी त्यातून साध्यता मात्र फार कमी अनुभवास मिळते. याचे कारण विद्यार्थ्यांसाठी हे काम म्हणजे एकप्रकारे हमाली कामच होऊन जाते. या सातत्यपूर्ण लेखनातून कंटाळा येणे साहजिक आहे; पण या सरावातून विद्यार्थ्यांचे अक्षरात सुधारणा होण्याऐवजी बिघाड झालेला पाहावयास मिळतो. याचे कारण हे काम म्हणजे फक्त शिक्षकांनी सांगितले म्हणून उतरून काढण्याचा विचार असतो. यात डोळे आणि हात कामी येतात, त्यात मेंदूचा वापर होण्याची शक्यता नाही म्हटल्यावर ते काम करण्यात थकवा येण्याची शक्यता अधिक असते. त्या कंटाळ्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतेवर होणार यात शंका नाही.

विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे लेखन करण्यास आवडते असा साधारण अनुभव असतो. आता ज्या कारणाने मुलांच्या लेखन क्षमता कमी झाल्या आहेत, त्यामागे मुलांसाठी आनंदाच्या लेखन पाऊलवाटा निर्माण केल्या असत्या तर बरेच काही साध्य झाले असते. मुलांना सतत स्वभाषेतील लेखनाकरीता स्वातंत्र्य देणे, त्यांच्या भावविश्वातील विषयांची निवड करून त्यांना त्या विषयावरती लिहिण्याचे स्वातंत्र्य देणे या गोष्टी महत्वाच्या असतात. कोरोनाच्या काळात विद्यार्थी रोज नवा अनुभव घेत आहेत. त्यांच्यावरती दडपण, तणाव आहे. त्याच बरोबर घरात बसून ते काही नव्याने शिकता आहेत. माध्यमातून ते काही जाणून घेता आहेत. आपल्या भवतालचे वातावरण ते न्याहाळता आहेत. रोज नवे काही कानावरती येते आहे. त्यासंदर्भाने ते विचार करता आहेत.आपल्या अवतीभोवती काही पाहाता आहेत. त्यावरती त्यांच्या मनात विचाराचे काहूर आहे. त्या मनातील प्रश्नांना जर वाट मिळाली आणि ती लेखनातून प्रकट झाली तर बरेच काही साध्य होण्याची शक्यता आहे. अगदी लहान वयात गावातील पाराच्या जवळ, कधी कधी बाजारतळावर येणारा गारूडी आणि त्याचा खेळ पाहिला की मनात अनेक प्रश्न यायचे; पण तो खेळ पाहाण्याच्या नादात जर शाळेला उशीर झाला तर शिक्षा व्हायची. शिक्षक पुस्तकातील एखादा धडा उतरून आणावयास सांगत..पण ती शिक्षा कंटाळवाणी वाटत असे. त्याऐवजी आमच्या मनात गारूड्याच्या खेळाने घर केले होते. त्या विषयी लिहिण्यास सांगितले असते तर आनंदाने लिहिले असते. मनात निर्माण होणार्‍या विचारांच्या लाटांना लेखनातून मुक्त वाट मिळाली तर हात आऩंदाने लिहिते होतील. खरेतर रोजची दैंनदिंनी हाच लेखनाचा, आनंदाचा विषय आहे. आपणाला कोणीतरी भेटते. रोज काहीतरी आपल्या संबंधी घडत असते. त्या घटना, प्रसंग हे सुध्दा लेखनाचे विषय असतात. विद्यार्थ्यांना त्या-त्या विषयावरती लेखनाची संधी मिळाली तर मुले लिहिते होतात. अगदी वर्गात सत्राच्या आरंभी विद्यार्थ्यांना कोणत्या विषयावरती व्यक्त होण्यास आवडते यासंबंधीची माहिती गप्पा, संवादातून मिळवायला हवी. त्या माहितीतून विषयाची सूची बनवायची. प्रत्येक विषयाची चिठ्ठी बनवायची. त्या सर्व चिठ्ठया एकत्रित करायच्या. शाळा सुटण्यापूर्वी किंवा मधल्या सुट्टीत एक एक विषयाची चिठठी उचलायची आणि पुन्हा त्या पिशवीत टाकायची. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोज एक विषय लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळेल. या लेखनात स्वातंत्र्य आहे. त्या प्रमाणे त्या विषयाची मांडणी करायची आहे. प्रत्येकाला रोज एक वेगळाच विषय मिळणार असल्याने अनुकरणाची किंवा पाहून लिहिण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याला एखादा विषय महिन्यात दोनदा आला तरी विद्यार्थी तो विषय पुन्हा नव्याने मांडू शकेल. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना दैनंदिनी लिहिण्याची सवय लावली तर त्यासारखा चांगला सराव नाही आणि त्या निमित्ताने विचार प्रक्रिया समृध्द होण्याबरोबर नेमकेपणाने विचार करण्याची सवय लागण्यास मदत होणार असते. गेले काही वर्ष माहिती तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यानंतर घरोघरी येणारे पोस्टमास्तर काका आता फारसे येत नाही, कारण समाज जीवनात पत्राचे असणारे स्थान मात्र कमी होत चालले आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना पत्र लिहिण्याची संधी आहे. पत्र लिहिणे कोणालाही आवडणारे आहे. याचे कारण आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्रांना लिहिण्याची संधी असते. पत्र म्हणजे एका अर्थाने संवाद असतो. त्यामुळे तो अधिक भावणारा असतो. अगदी अलीकडच्या काळात आपण पाहिले तर चला हवा येऊद्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अऱविंद जगताप, कवी अऩिल आणि त्यांची पत्नी कुसूम यांचा पत्रव्यवहार, यशवंतराव चव्हाण यांचा पत्रव्यवहार, भावे, अत्रे यांची पत्रे वाचली तर माणसांची हृदये जागी होतात. ती पत्रे कोणालाही भावून जातात. अशा परिस्थितीत पत्र लेखनाचा सराव देखील देता आला असता. पत्रे जशी आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीला लिहिता येतात, त्याप्रमाणे काल्पनिक स्वरूपाच्या तसेच इतिहासातील पात्रांशी संवाद साधणारी पत्रे लिहिता येतील. अशा संधी देणे म्हणजे मुलांच्या सृजनशीलतेचा विकास साधणे आहे. विद्यार्थ्यांसाठी आपण किती संधी निर्माण करतो हे महत्त्वाचे आहे. अभ्यासापलीकडे देखील लेखन असू शकते हे जाणून घेण्याची गरज आहे. या लेखनाचे उपाय सातत्याने अभ्यासाशिवाय राबविले असते तर विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव झाला असता. गती कमी न होता अधिक सुंदर अक्षरांचा अऩुभव आपणाला घेता आला असता. त्याचाही विचार करण्याची गरज आहे.

लेखनाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना जे काही आवडते त्या दिशेने प्रवास घडविला तर उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण करणे शक्य आहे. त्यामुळे शिक्षकांनी नव्या वाटा आणि संधीचा विचार करीत विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी पाऊलवाटा चालायला हव्यात. त्यातून सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेल्या संकटातही आपल्या अनेक पर्याय समोर आणता येतील. त्यामुळे संकट आहे म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरू असणार्‍या वाटा बंद न करता, संकटावर मात करतांना आपण पुन्हा नव्याने उभे राहण्याची गरज आहे. त्यातच विद्यार्थ्यांचे भले आहे. आज बाल साहित्याची वानवा आहे. विद्यार्थ्यांसाठी लिहिणारे हात फारसे नाहीत. त्याचे कारण विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वयोगटाला, त्यांच्या भावविश्वाशी नाते सांगणारे, त्यांच्या वयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम दर्जाचे लेखन केले, तर आपल्याला वाचन आनंदाच्या वाटा निर्माण करता येतील. लेखनासाठी जितकी प्रयोगशीलता आपण जोपासू तितके उत्तम साहित्यिक भविष्यात निर्माण होतील. त्यामुळे संकटाला संधी मानत आपण चालत राहूया..

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

 1. खूपच छान लेख.लेखन कला विकसित करणे,लेखनाविषयी आवड निर्माण करणे,काहीतरी लिहण्याची प्रेरणा स्वयंस्फूर्त होणे या भाषाशिक्षणातील प्रुभुत्व पातळीवरील अंतीम टप्पा मानला,तर भाषाविकासाची आधीची अंगे ही परिपूर्ण विकसित होणे,ती विकसित करण्यासाठी बालकाला सर्वतोपरी मदत करणे,तशा अध्ययन अनुभवांची मांडणी त्यांच्यासमोर करणे ,तसे अध्ययन पूरक वातावरण त्याला लाभणे ,यांवर याचे यशापयश अवलंबून आहे.काही वेळा वरील पैकी काहीही न घडता ही वयाच्या एखाद्या टप्प्यावर ही स्वयंस्फूर्तीने ही कला फुललेली दिसते.
  बालसाहित्यिक राजीव तांबे सरांचे बालपण ,त्यांचे शालेय जीवन /प्राथमिक शिक्षण हे पाहिले(ऐकले)
  तर आजचे तांबे सर आणि त्यांचा बालवयातील बिनधास्त पणा यांचा कुठेही मेळ लागत नाही.काहीच्या बाबतीत एखादी कला ही प्रयत्न करून ही फुलत नाही,तर काहींना ती अचानकपणे सुप्त शक्तींचा शोध लागून फुलवता येते.
  तांबे सर सांगतात ,माझी मुलगी लहानपणी हट्टी होती,गोष्ट सांगितल्याशिवाय ती जेवणच नसे.आणि ती गोष्ट सांगताना एखाद्या हॉटेलात मेनू आॅर्डर करावा , त्याप्रमाणे गोष्ट सांगायला लावे.जसे की ..मला आज अशी गोष्ट सांग की त्यात एक हत्ती असेल,एक चिमणी असेल ,आणि एक मुलगी असेल.
  ती रोज असे वेगवेगळे मेनू देई.मध्येच तिला वाटले तरी एखादा प्राणी वाढवी.अशा तिच्या हट्टामुळे ते गोष्टी रचू लागले.पुढे तिचे लेखन करू लागले.आज बालसाहित्य विश्वातील नामांकित साहित्यिक म्हणून नावारूपास आले.त्यांनी लिहलेले बालसाहित्य अनेक भाषांत भाषांतरीत झाले.
  ते सांगतात,माझ्या आईवडिलांनी च काय पण मला ज्यांनी ज्यांनी लहानपणी पाहिले आहे,त्यांना मी माझ्या आयुष्यात काही करेन असे कधी वाटलेच नव्हते.शेवटी लेखन च काय पण ६४ कलांमध्ये कोणतीही कला स्वयंस्फूर्तीने च फुलू शकते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा