मुंबई : कोरोना साथीच्या कालखंडात समाजमाध्यमाद्वारे विपणनाचे सामर्थ्य कमालीचे वाढले आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-20 क्रिकेटला चाहत्यांकडे पोहोचण्यासाठी याच माध्यमाकडे आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. अशा शब्दांत ‘स्टार आणि डिस्ने इंडिया’चे प्रमुख संजोग गुप्ता यांनी विश्लेषण केले. समाजमाध्यमांमुळे खेळाडू आणि चाहते अधिक जवळ आले आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘झूम’द्वारे जगभरातील 50 मुलांशी विराट कोहली बोलू शकतो याचा आतापर्यंत आपण कधीच विचार केला नव्हता, असे गुप्ता यांनी सांगितले.

आयपीएलच्या १४ व्या हंगामाला ९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. हॉटस्टारवर मराठीतील समालोचनसुद्धा उपलब्ध असेल. यात संदीप पाटील, अमोल मुझुमदार या माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. आयपीएलच्या देशभरातील चाहत्यांमधील 20 टक्के योगदान महाराष्ट्राचे आहे, असे गुप्ता यांनी आवर्जून सांगितले.

गतवर्षी आयपीएल-२०२० होईपर्यंत कोरोनामुळे देशभरातील सर्वच क्रीडा स्पर्धा स्थगित होत्या. क्रिकेटनंतर इंडियन सुपर लीग फुटबॉलसुद्धा यशस्वी झाली. पण तळागाळातल्या वयोगटांच्या, क्लबस्तरीय आणि हौशी क्रीडा स्पर्धांना याचा मोठा फटका बसला. त्यामुळे या धक्क्यातून सावरायला आणि पूर्वपदावर यायला आणखी काही महिन्यांचा कालावधी लागेल असे गुप्ता यांनी सांगितले.

जैव-सुरक्षित वातावरण आव्हानात्मक

खेळाडूंपेक्षाही प्रक्षेपणकर्त्यांसाठी जैव-सुरक्षित वातावरणात अधिक कठीण स्वरूपाचे असते. प्रत्येक संघात खेळाडू, मार्गदर्शक, व्यवस्थापक यांच्यासह कमाल 70 सदस्य असतात. परंतु आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी समालोचकांसह जवळपास 750 प्रक्षेपण कर्मचारी विविध जैव-सुरक्षित केंद्रांत कार्यरत आहेत. याशिवाय हॉटेलचे कर्मचारी, स्वयंपाकी, चालक यांनाही या जैव-सुरक्षित वातावरणात गणले जाते, असे गुप्ता यांनी सांगितले. कोणत्याही संघाचे खेळाडू 7 किंवा 10 दिवस आधी संघात विलगीकरणासाठी दाखल होतात. परंतु प्रक्षेपण कार्यातील बरेसचे व्यक्ती किमान तीन आठवडे आधी जैव-सुरक्षित वातावरणात दाखल होतात.म्हणजेच त्यांना आयपीएलसाठी तीन महिने जैव-सुरक्षित वातावरणात घालवावे लागणार आहेत. खेळाडूंना दीड महिन्यांत 14 ते 17 सामने खेळायचे आहेत. पण प्रक्षेपण कर्मचार्‍याला प्रत्येक दिवसाआड कार्यरत राहावे लागते. याशिवाय त्यांचे मैदानावरील कार्य चार तास आधी सुरू होते आणि सामना संपल्यावर दोन तासांनी संपते अशी माहिती गुप्ता यांनी दिली.

सामन्याचे थेट प्रक्षेपण झाल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालीच्या साहाय्याने आम्ही चार मिनिटांत त्याची क्षणचित्रे तयार करू शकू, असे गुप्ता यांनी सांगितले. येत्या ‘आयपीएल’मध्ये नवे काय, याची यादी बरीच मोठी आहे. परंतु थोडक्यात सांगायचे तर यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये सुरुवातीचे सामने हे प्रेक्षकांविनाच होणार आहेत. त्यामुळे जगभरातील प्रेक्षकांना घरी बसून सामन्याशी जोडणारी ‘फॅनवॉल’ प्रणाली आम्ही राबवणार आहोत. याशिवाय हॉटस्टारवर क्रिकेट चाहत्यांना आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करता येणार आहे असे गुप्ता यांनी सांगितले.

मुंबईत रंगणार १० सामने

मुंबई आयपीएलचे १० सामन्यांचे आयोजन करणार आहे. त्यातील काही सामने शनिवार व रविवारी होणार आहेत. मुंबईतील पहिला सामना 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्बंधानंतर मुंबईतील आयपीएल सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएल सामने मुंबईतच खेळवणार असल्याचे स्पष्ट केले. आता महाराष्ट्र सरकारनेही आयपीएलला परवानगी दिली आहे.

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएलचे सामने योजनेनुसार होतील याची पुष्टी केली आहे. नवाब मलिक एएनआयला म्हणाले, निर्बंधासह सामन्यांना परवानगी देण्यात आली आहे. लोकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. जे आयपीएलमध्ये भाग घेत आहेत, त्यांना आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. याच आधारावर आम्ही परवानगी दिली आहे.

बीसीसीआय अध्यक्ष गांगुली म्हणाला, आम्हाला सरकारच्या वतीने सामना आयोजित करण्याची सर्व परवानगी मिळाली आहे. 10 ते 25 एप्रिल दरम्यान मुंबईत फक्त 10 सामने होणार आहेत. बायो बबलमध्ये कोणतीही समस्या नाही. आमच्याकडे एक अतिशय सुरक्षित सेटअप आहे, जिथे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. चार संघ आपले सलामीचे सामने मुंबईत खेळणार आहेत. त्यात चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्तान रॉयल्स हे संघ आहेत.

‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ गाण्यावर मुंबई इंडियन्सचा भन्नाट डान्स आयपीएलच्या नव्या पर्वाला आता दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या लीगमधील सर्व संघ जय्यत तयारी करत आहेत. सरावानंतर सर्व संघ जाहिरात प्रमोशन, फोटोशूट यात व्यस्त आहेत. अशातच पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात मुंबईचे खेळाडू एका आगरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

सुप्रसिद्ध आगरी गीत ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ या गाण्यावर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, पंड्या बंधू थिरकताना दिसत आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिसाद दिला आहे. खरे तर, या व्हिडिओतील गाणे आणि डान्स वेगळा असून चांहत्यांना कोणाची स्टेप जास्त आवडली, असा सवाल मुंबईने कॅप्शनमध्ये विचारला आहे. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आठ वर्षातच त्याने मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन बनवले. 2008 ते 2012 या पाच वर्षांत मुंबईकडे आयपीएलचे एकही विजेतेपद नव्हते. त्यानंतर मुंबईने झटपट पाच विजेतेपदे नावावर केली आणि या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हणून किताब मिळवला. गतविजेत्या मुंबईचा पहिला सामना 9 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी चेन्नईत होणार आहे. मुंबईच्या संघात रोहित शर्मा, क्रुणाल पंड्या, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, ईशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांसारखे मातब्बर खेळाडू आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा