पुणे : शासन आणि प्रशासनाने घातलेल्या कडक निर्बंधामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. त्यात काम करणार्‍या सुमारे 3 लाख कामगारांचा रोजगार थांबला आहे. एकीकडे काम बंद आहे, तर दुसरीकडे घरखर्च, वीज बिल, ज्येष्ठांचे औषध, कर्जाचे हप्ते सुरूच आहेत. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत तुम्हीच सांगा आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न कामगार उपस्थित करीत आहेत.

सोने, चांदी, कापड, जनरल स्टोअर्स, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक्स, हार्डवेअर, प्रकाशन संस्था, छपाईचे कारखाने, गॅरेज, सौंदर्य प्रसाधने, सलून आदींसह अन्य प्रकारची दुकाने बंद आहेत. यात विविध पदांवर विविध प्रकारचे काम करणार्‍या कामगारांची संख्या सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक आहे. या कामगारांवर त्यांचे कुटुंबीय अवलंबून आहेत. त्यांची संख्या सुमारे 15 ते 20 लाख इतकी आहे. या कामगारांचे दररोज अथवा महिन्याला मिळणार्‍या पगारावर घर चालते. मात्र या कामगारांचा रोजगार थांबल्याने त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

कामगार रोजच एक ना अनेक समस्यांना तोंड देत असतात. काम अथवा नोकरी हाच त्यांचा जगण्याचा मुख्य आधार आहे. काम सुरू असतानाही कामगार विविध प्रश्न डोक्यात घेऊन वावरत असतात. आता तर कामच थांबले आहे.त्यामुळे नीट जगताही येत नाही आणि मरताही येत नाही. अशी द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे. किराणा, दूध, वीज, सिलिंडर, ज्येष्ठांचे आजारपण, मुला- मुलींचे शिक्षण, कर्जाचे हप्ते एवढा खर्च कोठून आणि कसा भागवायचा? शासन आणि प्रशासनाने अचानक काम बंद केले. आमची घरे कशी चालणार? याचा विचार केला नाही. निर्बंध लागू करण्याआधी कामगारांचा विचार करायला हवा होता, असा सवालही कामगारांनी उपस्थित केला.

काही महिन्यांपूर्वीच पुण्यात आलोय

काही महिन्यांपूर्वीच कामानिमित्त पुण्यात आलो आहे. मी हॉटेलमध्ये काम करतो. आता हॉटेल पार्सलसाठी खुली आहेत. काम कमी झाले आहे. गावाकडे परतायचे म्हटले, तरी गाड्या बंद आहेत. रेल्वेचे 15 ते 20 दिवसांचे वेटिंग आहे. त्यामुळे आता इथे थांबून करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात लॉकडाऊन झाले, तर प्रचंड अडचणी निर्माण होतील.

  • ब्रिजेश यादव, कामगार

घर चालवायचे कसे?

मी नाष्टा विक्रीच्या हातगाडीवर काम करतो. मात्र निर्बंधामुळे वेळेचे बंधन आले आहे. त्यामुळे आहे ते काम टिकेल की नाही? याची शाश्वती नाही. घर माझ्यावर अवलंबून आहेत. माझे काम टिकले, तरच घर चालते. महागाई वाढल्याने घरखर्चही वाढला आहे. त्यामुळे घर चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. आता रोजगारच थांबला, तर करायचे काय? या विचारानेच डोके चालायचे बंद होत आहे.

  • रूपेश गायकवाड, कामगार
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा