६३० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांत विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. देशात बुधवारी 1 लाख 15 हजार 736 नव्या रुग्णांची भर पडली. तर, 630 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. दुसरीकडे, सक्रिय रुग्णांची संख्या आठ लाखांवर पोहोचली आहे. एकंदरितच, वाढती रुग्णसंख्या आणि मृत्युमुळे शासनाची चिंता वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण रुग्ण संख्या 1 कोटी 28 लाख 1 हजार 785 वर पोहोचली. तर, बळींची संख्या?1 लाख 66 हजार 177 इतकी झाली. गेल्या 24 तासांत 55 हजार 250 रुग्ण कोरोनामुक्त झाले. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्येत 55 हजार 250 रुग्णांची भर पडली. तर, 59 हजार 856 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 17 लाख 92 हजार 135 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

चिंतेची बाब म्हणजे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण किंचितसे घटले आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.11 टक्के इतके आहे. तर, मृत्युदर 1.30 टक्के इतका आहे. एकूण रुग्णसंख्येपैकी 6.59 टक्के म्हणजे, 8 लाख 43 हजार 473 रुग्ण सक्रिय आहेत.

पहिल्या लाटेत सप्टेंबरमध्ये 97 हजार रुग्ण समोर आले होते. दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्येने एक लाखाचा टप्पा अवघ्या काही दिवसांत ओलांडला. दोन दिवसांपूर्वी प्रथमच 1 लाख 3 हजार रुग्ण आढळून आले होते.

देशात महाराष्ट्रासह प्रामुख्याने आठ राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन आणि कठोर निर्बंधासारखे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय, लशीकरणावरही भर देण्यात येत आहे मात्र, यानंतरही कोरोनाची साखळी तोडण्यात यश येताना दिसत नाही.

पंजाबमध्ये रात्रीची संचारबंदी

पंजाब सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी हा आदेश लागू असणार आहे. रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत रात्र संचारबंदी असणार आहे. याआधी, राज्यातील १२ जिल्ह्यांसाठी १० एप्रिलपर्यंत हा आदेश लागू होता.

आता संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना नियमावलीचे नागरिकांनी काटेकोर पालन केले नाही तर निर्बंध अधिक कठोर केले जातील, असेही सिंह यांनी म्हटले आहे. राजकीय कार्यक्रमांवरदेखील सरकारने बंधने आणली आहेत. पंजाबमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारदेखील चिंतेत आहे. पंजाबमध्ये ८० टक्के रुग्णांमध्ये ब्रिटनमधील नवा कोरोना आढळून आला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा