पुणे : मिनी लॉकडाउनच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने शहरात संपूर्ण लॉकडाउन केला असून, त्यामुळे पुणेकरांचे जीवनमान ठप्प होणार असून, शहराची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये एक नियम आणि पुण्यात वेगळा नियम हे अन्यायकारक आहे. पुण्यात लादलेले नियम तातडीने शिथिल करावेत आणि राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी जारी केलेली नियमावली लावावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि खासदार गिरीश बापट यांनी केली अन्यथा रस्त्यावर उतरून कायदेभंग करू असा इशारा दिला.

मुळीक म्हणाले, ‘शहरातील सर्व प्रकाराची दुकाने यापूर्वी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र, सुधारित आदेशात अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने वगळता सर्व प्रकाराची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील छोटे व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या कर्मचार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हातावर पोट असणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना रोजचा उदरनिर्वाह अवघड होणार आहे.’

खासदार बापट म्हणाले, ‘विमान, रेल्वे, एसटी यांच्यासह संपूर्ण राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहणार आहे. मात्र पुणे शहराची जीवनवाहिनी असणारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस अत्यावश्यक सेवा वगळता 30 एप्रिलपर्यंत बंद केल्या आहेत. या बससेवेचा दररोज पाच लाख प्रवासी लाभ घेतात. केवळ पाच रुपयांत प्रवास करता येत असल्याने सर्वसामान्यांना परवडणारी ही सेवा आहे. परंतु ती बंद केल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

शहरात कोरोनाबाधितांसाठी अधिकाधिक खाटा उपलब्ध करून द्याव्यात, ऑक्सिजनयुक्त आणि व्हेंटिलेटरच्या खाटा उपलब्ध होत नाहीत, त्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढवावी, कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, लशीकरणाचा वेग वाढवावा, आवश्यकतेनुसार डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या कराव्यात. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आवश्यक माहिती यंत्रणा विकसित करावी, अशा मागण्या पक्षाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या सर्वांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

पुणे शहर भाजपच्या वतीने लशीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आजपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक स्तरावर लशीकरणासंदर्भात माहिती, मार्गदर्शन, जनजागृती, नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना लशीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा