पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आता विवाह सोहळ्यात सहभागी होणार्‍या निमंत्रितांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. चाचणी केली नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल, त्याचबरोबर मंगल कार्यालयाला 10 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विवाह सोहळ्यापूर्वीच निमंत्रितांची कोरोना चाचणी करावी, त्यातून अनर्थ टळू शकेल, अशी भूमिका पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी नुकतीच ‘केसरी’तून मांडली होती.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विवाह सोहळ्यातील निमंत्रितांना कोरोना चाचणी सक्तीची करण्याचा आदेश काढला.

कोरोना असतानादेखील विवाह सोहळे धडाक्यात होत आहेत. आता या सोहळ्यांचे चित्रीकरण करणे आणि त्याची सीडी पाच दिवसांच्या आत पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक राहील. याशिवाय मंगल कार्यालयाबाहेर ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनिंग गनचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. उपस्थितांचे नाव, मोबाइल क्रमांक आणि स्वाक्षरीदेखील घेतली जाईल. याची जबाबदारी कार्यालयाचे व्यवस्थापक-मालक यांच्यावर राहणार असून, नियम न पाळल्यास त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्याचा, तसेच कार्यालयाचा परवाना रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिला आहे.

लग्न सोहळ्यात 50 व्यक्तींच्या उपस्थितीचे बंधन आहे. आचारी, पुजारी, छायाचित्रकार, वाढपी, वाजंत्री आणि दोन्ही पक्षांतील वर्‍हाडी यांचा यामध्ये समावेश असेल. या सर्वांनी आरटीपीसीआर तपासणी करून कोरोना नसल्याचे अथवा लशीकरण प्रमाणपत्र जवळ ठेवणे बंधनकारक राहील.

लग्न सोहळ्यात प्रत्येक व्यक्तीमध्ये ठराविक अंतर असणे, त्याप्रमाणे आसन व्यवस्था करणे, जेवण करताना अंतर ठेवणे, तोंडाला मास्क लावणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनादेखील डॉ. देशमुख यांनी केल्या आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा