पुणे : महाराष्ट्रात शनिवार रविवार वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर केला असला, तरी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा व राजपत्रित गट (ब) संयुक्त परीक्षा येत्या रविवारी (दि.11) नियोजीत वेळेत होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून परीक्षेची तयारी करण्यात आली आहे. परीक्षेला सुमारे 42 हजार 700 उमेदवार असून त्यांच्यासाठी 109 उपकेंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावासंदर्भात नियम पाळून परीक्षा घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने शनिवार, रविवार पूर्णतः वीकेण्ड लॉकडाऊन घोषित केला आहे. दरम्यान एमपीएससीच्या वेळापत्रकानुसार रविवारी महाराष्ट्र दुय्यम सेवा व राजपत्रीत गट (ब) परीक्षा होणार असताना उमेदवार वीकेण्ड लॉकडाऊनमुळे चिंतित होते. मात्र ही परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचे जाहीर केले.

याबाबत अधिक माहिती सांगताना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे म्हणाल्या, ’या परीक्षेची पूर्ण तयारी झाली आहे. जिल्ह्यातील 109 उपकेंद्रांवर परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे 42 हजार 700 उमेदवार असणार आहेत. संबंधित केंद्रांवर तब्बल चार हजार कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. केंद्रावर नेमलेल्या सर्व कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या परीक्षेच्या दोन दिवस अगोदर आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येणार आहे’

‘परीक्षेसाठी येणार्‍या प्रत्येक उमेदवाराचे शरीराचे तापमान तपासले जाणार असून, सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे’ असे डॉ. कटारे म्हणाल्या. दरम्यान, या सर्व केंद्रांवर राखीव कर्मचारीदेखील ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर असणार्‍या कर्मचार्‍यांची, उमेदवारांची संख्या आणि तेथील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील नियोजन याबाबत पूर्ण तयारी करण्यात आली असून, कोरोनाबाबत राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार सुरक्षित अंतर ठेवून परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे डॉ. कटारे यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा