नवी दिल्ली : चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशासाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. याचसोबत मल्लपुरम आणि कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले. तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेसाठी अनुक्रमे 71.79, 73.02, 81.84 टक्के सरासरी मतदान झाले. आसाममध्ये 82.28, तर पश्चिम बंगालमध्ये 84.21 टक्के मतदान झाले.

तामिळनाडू (234), केरळ (140) आणि पुद्दुचेरी (30) विधानसभेसाठी काल एकाच टप्प्यांत मतदान पार पडले. पश्चिम बंगालमध्ये (40) तिसर्‍या टप्प्यासाठी, तर आसाममध्ये (31) तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान पार पडले.

तामिळनाडूत अण्णा द्रमुक सलग तिसर्‍यांदा विजय नोंदविणार? की द्रमुक एका दशकानंतर पुन्हा सत्तेत येणार? हे आता 2 मे रोजी निकालानंतर स्पष्ट होणार आहे. याचसोबत मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि द्रमुक नेते एम.के. स्टॅलिन यांच्या भवितव्याचादेखील फैसला होणार आहे. द्रमुकबरोबरच भाजप, पीएमके आणि अन्य प्रादेशिक पक्षांनादेखील निकालाची उत्सुकता असणार आहे. द्रमुक संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक पक्ष असून, काँग्रेससह 11 पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. एमएनएम पक्षाचे नेते आणि अभिनेता कमल हासन हेही नशीब अजमावत आहेत.

कन्नूरच्या पय्यानूर परिसरात एका मतदान केंद्रावर पीठासीन अधिकारी मोहम्मद अशरफ कलाथिल यांच्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात कलाथिल जखमी झाले असून, स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक व्यक्ती रेशन कार्डच्या आधारे मतदान करू पाहत होती. त्यास कलाथिल यांनी नकार दिला. त्यातून हा प्रकार घडला.

तामिळनाडूत द्रमुक नेता उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात अण्णाद्रमुक नेता बाबू मुरुगावेल यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. उदयनिधी यांनी पक्षाचे चिन्ह असलेला शर्ट परिधान करून मतदान केल्याचा आरोप आहे.

पश्चिम बंगालमध्ये तारकेश्वर मतदारसंघातील भाजपच्या एजंटांनी आपणास केंद्रावर मतदानास परवानगी दिली नाही, असा आरोप केला. तामिळनाडूत अन्य राज्यांच्या तुलनेत कमी मतदान झाले. सकाळी दहापर्यंत पश्चिम बंगालमध्ये 14.62 टक्के, केरळमध्ये 15.33 टक्के, आसाममध्ये 12.83 टक्के, पुद्दुचेरीत 15.63 टक्के, तर तामिळनाडूत 7.36 टक्के मतदान झाले होते. तर, दुपारी 1 पर्यंत पश्चिम बंगालमध्ये 53.89 टक्के, केरळमध्ये 47.28 टक्के, आसाममध्ये 53.23 टक्के, पुद्दुचेरीत 57.76 टक्के तर तामिळनाडूत 39 टक्के मतदान पार पडले होते. दुपारी तीनपर्यंत हेच प्रमाण अनुक्रमे 66.73 टक्के, 58.09 टक्के, 67.10 टक्के, 66.06 टक्के, 52.18 टक्के इतके होते.

तामिळनाडूत 3 हजार 998 जणांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले. आसाममध्ये हिमंत बिस्वा शर्मा यांच्यासह 337 जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. पश्चिम बंगालमध्ये तिसर्‍या टप्प्यासाठी 205 उमेदवार नशीब आजमावत आहेत. आता केवळ आसाममध्ये उर्वरित पाच टप्प्यांसाठी मतदान होणार आहे. 10 एप्रिल, 17 एप्रिल, 22 एप्रिल, 26 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान पार पडेल. त्यानंतर 2 मे रोजी सर्व विधानसभा निवडणुकांचा निकाल मतमोजणीनंतर जाहीर होईल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा