पुणे : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातदेखील कडक निर्बंध लादण्यात आले असून, मंगळवारी याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश प्रसृत केले. नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई करण्याचे आदेशात नमूद केले आहे.

ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, छावणी परिषद, हद्दीतील क्षेत्रात मनोरंजन व करमणूक संबंधित कार्यक्रमांवर बंधने घालण्यात आली आहेत. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क, अ‍ॅम्यूजमेंट पार्क, व्हिडीओ गेम पार्लर, वॉटर पार्क, स्विमिंग पूल, व्यायामशाळा, क्रीडा संकुले आदी पूर्णतः बंद राहतील.

हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूडकोर्ट पूर्णतः बंद राहणार आहेत. ज्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आहे, ते मर्यादित संख्येत सुरू ठेवण्यात येणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरू राहील. ही सेवा घरपोच असून, संबंधित हॉटेलमधून पार्सल घेता येणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. हॉटेलमधील रेस्टॉरंट, बार हे रूम सर्विससाठी सुरू राहतील. मात्र, बाहेरून येणार्‍यांना मज्जाव असेल.

रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवासी, टॅक्सी, कॅब आणि चारचाकीमध्ये 50 टक्के आसन क्षमता आणि बसमध्ये प्रवासी उभे राहून प्रवास करण्यास प्रतिबंध राहणार आहे. चारचाकीमध्ये प्रवास करताना मुखपट्टी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण भागात पीएमपी सेवा अत्यावश्यक सेवांसाठी वगळून 9 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. कोरोनाविषयक कामकाज करणारी शासकीय कार्यालये, विद्युत व पाणीपुरवठा क्षेत्राशी संबंधित कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. महत्त्वाचे काम असल्यास संबंधित शासकीय कार्यालयाकडून परवाना मिळेल, मात्र अभ्यागतांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगणे अनिवार्य आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

चित्रीकरण, उद्योग आणि उत्पादन क्षेत्राला परवानगी

ग्रामीण भागात चित्रीकरण, उद्योग क्षेत्र, अत्यावश्यक सेवेशी संबंधित माहिती तंत्रज्ञान कंपन्या, सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. मात्र, उद्योगांनी त्यांच्या कर्मचार्‍यांचे तातडीने लसीकरण करून घ्यावे, एखादा कर्मचारी बाधित सापडल्यास स्वखर्चाने संबंधितांना विलग करावे आणि संपूर्ण युनिट बंद करावे, 500 पेक्षा जास्त कामगार असणार्‍या उद्योगांनी स्वत: विलगीकरण केंद्र सुरू करावे. बाधित कर्मचार्‍याला पगारी वैद्याकीय रजा द्यावी आणि संबंधितांची सेवा खंडित करू नये. चित्रपट, मालिका, जाहिरातींचे चित्रीकरण मोठ्या संख्येने करू नये, कलाकार व कर्मचारी यांनी 15 दिवसांची वैधता असलेला नकारात्मक चाचणी अहवाल जवळ बाळगणे अनिवार्य आहे, असे आदेशात म्हटले आहे.

८० टक्के प्राणवायू उत्पादन वैद्यकीय वापरासाठी

औद्योगिक कंपन्यांना शनिवार दि.१० एप्रिलपासून प्राण वायूचा कच्चा माल म्हणून वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्राणवायू उत्पादन कंपन्यांनी ८० टक्के प्राणवायू पुरवठा वैद्यकीय कारणांसाठीच करावा. प्राणवायूचा वापर करणारे आणि पुरवठा करणारे यांची यादी 10 एप्रिलपर्यंत प्रसिद्ध करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा