पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीनेे डेक्कन कॉलेजचे कुलपती आणि भारतीय विद्येचे गाढे अभ्यासक डॉ. अरविंद जामखेडकर, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाब्रिया व बंगळुरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील शास्त्रज्ञ डॉ. रोहिणी गोडबोले यांना सन्माननीय डी. लिट. (विद्यानिधी) पदवी देऊन गौरविले जाणार आहे. दि. ९ एप्रिल शुक्रवार रोजी टिमविचा पदवीप्रदान सोहळा सकाळी दहा वाजता ऑनलाइन होणार आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक आणि प्रभारी कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांनी ही माहिती दिली.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा हा ३४ वा पदवीप्रदान सोहळा आहे. टिमविचे यंदा शताद्बी वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा पदवीप्रदान सोहळा ऑनलाइन होणार आहे. यावेळी 41 जणांना पीएच.डी., 5 विद्यार्थ्यांना एम. फिल.,कौशल्य विकास शाखेच्या 226 विद्यार्थ्यांना तर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 3 हजार 126 विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे. कुलपती डॉ. दीपक टिळक यांचे विद्यार्थ्यांना उद्देशून दीक्षांत भाषण होईल.

टिमविच्या वतीने याआधी डॉ. जयंत नारळीकर, डॉ. गो. बं. देगलूरकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, प्राचार्य राम शेवाळकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट, विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आणि राणी बंग, ज्येष्ठ उद्योजक डॉ. आनंद देशपांडे, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर, ‘सीरम’ कंपनीचे संस्थापक-कार्यकारी अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रमोद चौधरी यांना डी. लिट.ने गौरविण्यात आले आहे.

यावर्षी डी. लिट. देऊन गौरविले जाणारे डॉ. अरविंद जामखेडकर हे भारतीय विद्या या क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ आहेत. महाराष्ट्र राज्य पुरातत्त्वशास्त्र आणि संग्रहालये विभागाचे संचालक ?म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे अनेक उत्खनने केली आहेत. नायकुंड येथील उत्खननातून इसवीसन पूर्व नवव्या शतकाचा इतिहास पुढे आला. वाकाटक कालखंडाच्या अभ्यासातील ते अग्रणी आहेत. प्राचीन शिल्पांच्या त्यांच्या अभ्यासातून विदर्भातील नरसिंहाची जुनी मंदिरे उजेडात आली. पवनी, भोकरदन, मांढळ, कंधार, वाशिम आदी ठिकाणी केलेल्या उत्खननांवरुन ती ठिकाणे नावारुपाला आली. मंदिर स्थापत्य शास्त्रातील त्यांच्या योगदानाची जगभर दखल घेण्यात आली. त्यांच्या संशोधन पद्धतीचे आणि शैक्षणिक दृष्टीकोनाचे देशभर अनुकरण झाले. अनेक अभ्यासक्रमांची रचना त्यांनी केली असून कलेचा इतिहास, उत्खननशास्त्र, मूर्तिशास्त्र, चित्रकला, स्थापत्य आदी विषयांवर देशभर त्यांची व्याख्याने झाली आहेत. डेक्कन कॉलेजच्या संस्कृत शब्दकोशासाठी डॉ. जामखेडकर यांचे मोठे योगदान आहे.

गेल्या 33 वर्षाहून अधिक काळ उद्योग क्षेत्रात नेतृत्व करणारे फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाब्रिया यांचा डी. लिट. देऊन सन्मान केला जाणार आहे. गुणवत्तेचा अखंड ध्यास, नव्या कल्पनांचा स्वीकार व भविष्याची वेध घेण्याची दृष्टी ही प्रकाश छाब्रिया यांची वैशिष्ट्ये आहेत. फिनोलेक्सची उत्पादने भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कृषी विभागासह अन्य विभागांतही फिनोलेक्सने काम केले आहे. छाब्रिया यांच्या नेतृत्वाखाली फिनोलेक्स समूहाने उद्योग क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवले. मुकुल माधव फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यासाठी छाब्रिया यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, अ‍ॅग्रीकल्चर अँड इंडस्ट्रीजच्या उपाध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. त्याचबरोबर श्री श्री माँ आनंदमयी आश्रमाचे ते अध्यक्ष आहेत.

संशोधन हेच जीवनव्रत स्वीकारणार्‍या ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रोहिणी गोडबोले यांचा केंद्र सरकारने पद्मश्री किताब देऊन सन्मान केला आहे. फ्रान्स सरकारने ‘फ्रेंच नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्काराने त्यांना गौरविले. ‘कण भौतिकी’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. अमेरिकेच्या ‘हाय एनर्जी फिजिक्स’ या विषयाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ‘ऑक्सफर्ड रिसर्च एन्सायक्लोपीडिया ऑफ फिजिक्स’साठीच्या सल्लागार संपादक मंडळामध्ये सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. संशोधनातल्या जागतिक कामगिरीसाठी आणि योगदानासाठी त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले.

ठाणे येथील डॉ. श्रीनिवास आठल्ये यांनी लोकमान्यांच्या पत्नी सत्यभामाबाई टिळक यांच्यावर ‘सत्यभामा’ ही कादंबरी लिहिली असून, पदवीप्रदान सोहळ्यात या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. हा सोहळा दि.९ (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता https://youtube.com/channel/UCqZRgwD4mP9fcRaQ_5FBXw

या लिंकवर पाहता येईल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा