पुणे : शहरासह जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन करण्यात आले असून शासकीय कार्यालयांत 50 टक्के उपस्थितीत कामकाज सुरु ठेवावे, सरकारी कामासाठी नागरिकांना मज्जाव असे आदेश काढण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी प्रशासकीय कार्यालयांमध्ये पूर्णतः शुकशुकाट होता. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला असून आगाऊ वेळ घेतली असल्यास संबंधितांना प्रवेश देण्यात येत आहे.

सरकारी कामांसाठी सतत वर्दळ असलेल्या मध्यवर्ती शासकीय इमारत, विधान भवन, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद या ठिकाणी शुकशुकाट होता. मध्यवर्ती शासकीय इमारतीत बहुतांश सरकारी कार्यालये आहेत. त्यामध्ये सहकार, कृषी, शिक्षण या विभागांची आयुक्तालये आहेत. तसेच अन्नधान्य वितरण कार्यालय, नगररचना, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ, जनसंपर्क कार्यालये, पणन विभाग, सहकारी निवडणूक प्राधिकरण आदी प्रमुख कार्यालयांचा समावेश आहे. या ठिकाणी सरकारी कर्मचारी वगळता अन्य नागरिकांची संख्या अत्यल्प होती.

नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक, माहिती आयुक्तालय, जमाबंदी आयुक्तालय, भूमी अभिलेख, राष्ट्रीय हरित न्यायालय, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आदी विभागांची कार्यालये आहेत. या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते. कडक निर्बंधांमुळे या कार्यालयांमध्ये शांतता होती. विधान भवनामध्ये विभागीय आयुक्त यांचे कार्यालय आहे. या ठिकाणी पुण्यासह पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमधील नागरिकही कामानिमित्त येत असतात. या ठिकाणी निर्बंधांमुळे तुरळक नागरिक होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आले होते. नागरिकांची चौकशी करून आगाऊ वेळ घेतलेली असल्यासच इमारतीत प्रवेश देण्यात येत होता.

…तरच शासकीय कार्यालयांत प्रवेश

कोरोनाविषयक कामकाज करणारी शासकीय कार्यालये, विद्युत व पाणीपुरवठा क्षेत्राशी संबंधित कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. महत्त्वाचे काम असल्यास संबंधित शासकीय कार्यालयाकडून परवाना मिळेल, मात्र अभ्यागतांना आरटीपीसीआर चाचणी (48 तासांची वैधता असणारा) अहवाल बाळगणे अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या आदेशात नमूद केले आहे.

महापालिका भवन, क्षेत्रीय कार्यालयांत नागरिकांना प्रवेश बंदी

कोरोना प्रादुर्भावामुळे महापालिका मुख्य भवन आणि क्षेत्रीय कार्यालय नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रसृत केले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन होत नसल्याचे चित्र महापालिका भवन आणि अन्य कार्यालयांत दिसून येत आहे. नगरसेवकांचे कार्यकर्ते, ठेकेदार कार्यालयांत मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा