मुंबई : कोरोना कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोटे व्यवसायीक आणि जनमानसात तीव्र नाराजी आहे. या सर्व घटकांशी पुन्हा नव्याने चर्चा करून नव्याने अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात फडणवीस म्हणाले की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील, असा आपला दूरध्वनी आला होता. दोन दिवसांचा लॉकडाउनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाउन सदृश निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करत आहेत. हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधांबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होता कामा नये. असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा