आजचे एकांत दान
आता सर्वात्मके देवे । विनाकारण न फिरावे ।
घरीच बैसोनि द्यावे । एकांतदान हे ॥ 1॥
एकमेका कर न मिळवावे । दुरुनीच नमस्कारावे ।
अंतर सुरक्षित राखावे । परस्परांमाजी ॥ 2॥
सदासर्वदा हात धुवावे । रुमालाविणा ना शिंकावे ।
कोमट जल प्राशावे । थंड वर्जावे सर्वथा ॥ 3॥
घरी बसण्याचा येता कंटाळा । जोपासावी एखादी कला ।
मदत करावी गृहिणीला । पुण्य लागे ॥ 4॥
करा स्वच्छता सदनाची । त्याच बरोबर तनाची ।
काढा जळमटे मनाची । शूचिर्भूत व्हावया ॥ 5॥
मनन आणि चिंतन । थोडा वेळ नामस्मरण ।
चुकविता येईल मरण । तुम्हासहित इतरांचे ॥ 6॥
आजपावेतो खूप पळाला । दे विश्रांती थोडी शरीराला ।
सादर व्हावे समयाला । संत वचन हे ॥ 7॥
आहे विषाणूचे संकट । करी मनाला बळकट ।
सकारात्मकतेचे उभारी तट । सभोवताली ॥ 8॥
वेळ नव्हती म्हणोन । केले नसेल वाचन ।
ज्ञानेश्वरी ग्रंथ पावन । आता तरी वाचावा ॥ 9॥
आयुष्यभर पुरेल । पुरोनिया उरेल ।
ग्रंथांची रेलचेल । संतकृपेकरोनी ॥ 10॥
आवाहन करी वारंवार । केंद्र व राज्य सरकार ।
धोका वाढेल फार । बेफिकीरिने ॥ 11॥
खाकी वर्दी आणि डॉक्टर । सोबत स्वच्छता कामगार ।
काळजी घेती तत्पर । सकल जनांची ॥ 12॥
हेही दिस जातील निघोन । उद्या येईल आशेचा किरण ।
तोवर संयमाचे पालन । कर मनुजा ॥ 13॥
येथ म्हणे श्री निसर्गरावो । कोरोना ना पसरावो ।
स्वच्छतेचे गीत गावो । जनकल्याणहेतू ॥ 14॥

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा