संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै

आपल्या इच्छेच्या काय आड येते ते आपल्याला नको असते व आपल्याला अनुकूल काय ते आपल्याला हवे असते. जीवनांत काम हा महत्वाचा आहे. कामातून क्रोध व लोभ निर्माण होतात. मोह कसा निर्माण होतो? तुमच्या कामना तृप्त होवू लागल्या की त्या गोष्टींबद्दल तुम्हांला मोह वाटू लागतो. मद कशाला म्हणतात? मी कुणीतरी आहे असे वाटू लागते त्याला मद म्हणतात. मत्सर कधी वाटू लागतो? आपल्या कामना तृप्त न होता ते कुणाला तरी मिळू लागले की मत्सर निर्माण होतो. आपल्याला पैसा मिळाला नाही व तो दुसर्‍या कुणाला तरी मिळाला की आपल्याला मत्सर वाटू लागतो. गरिब लोकांना शीमंतांबद्दल मत्सर वाटतो. झोपडीत रहाणारे लोक बंगल्यात रहाणार्‍या लोकांचा मत्सर करतात. का्रेध, लोभ, मोह, मद, मत्सर हे निर्माण होतात त्याची मूळ प्रेरणा आहे काम. ही इच्छा नसेल तर जीवन सुखी होणार नाही. वैराग्याबद्दल चुकीच्या समजूती घेऊन लोक साधू संन्यासी झाले. इच्छा देवाच्या आड येते म्हणून हया इच्छेचा त्याग करा. त्याग करा म्हणजे काय करा हे कळलेच नाही. आसक्ती व विरक्ती या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. आसक्तीच्या विरूद्ध विरक्ती. विरक्ती आवश्यक आहे पण किती प्रमाणात! जीवन जगत असताना तुम्ही सुवर्णमध्य साधा. आसक्ती नको व विरक्तीही नको तर पाहिजे ती भक्ती. संतांनी देवाची भक्ती करायला सांगितली. संसारात राहूनही देवाची भक्ती करता येते म्हणून संसार सोडू नका. संसार सोडल्यावर काय होते हे ज्यांचे त्यांनी ठरवावे. संसार सोडून जे जातात त्यातले बहुतेक लोक परत येत नाहीत. जे देवाच्या प्राप्तीसाठी गेले त्यांना देव मिळाला नाही त्यामुळे ना संसार ना परमार्थ तुका दोहींकडे चोर अशी फजिती झाली. संसार सोडू नका. संसार सोडलात तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. संसारात आपण खरेतर सुखी असतो पण आपण सुखी असतो हे आपल्या लक्षांत येत नाही. एक घडलेली गोष्ट सांगतो. आमचे एक मित्र शिर्डीला गेले होते. तिथून परत आल्यावर ते आम्हांला भेटायला आले होते. मी म्हटले वा वा तुम्हांला साईबाबांचे दर्शन झाले ना! ते सांगू लागले काय सांगू वामनराव तिकडे आमची अशी सोय झाली की सकाळी उठल्याबरोबर गरम गरम चहा, आंघोळीला गरम गरम पाणी, जेवायला गरम गरम वरणभात. हे सगळे गरम गरम ऐकून मी गरम झालो. मी त्यांना म्हटले हे तुम्हांला जे तिथे मिळाले ते आम्हांला घरी बसून मिळते. गरम गरम चहा, गरम गरम आंघोळीचे पाणी, गरम गरम जेवण हे सर्व आम्हांला घरी बसून मिळते मग तुम्ही तिथे जावून काय मिळविले?

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा