लशीकरणाबाबत संभ्रम वाढवू नका

केंद्र सरकारने कोरोना लसींच्या दोन डोसमधील कालावधी 28 दिवसांवरून 8 आठवडे करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांना तो अंतर्गत कार्यालयीन माध्यमांतून अंमलबजावणीकरिता पुढे पोहोचविला. दोन डोसमधील कालावधी वाढविल्यास लस 80 टक्के अधिक परिणामकारक होत आहे, असे इंग्लंड, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतील परीक्षणानंतर स्पष्ट झाले होते. पहिल्या डोसनंतर शरीरात अँटीबॉडिज निर्माण होण्यास झालेली सुरुवात 6 ते 8 आठवड्यात पुढे वाढवून लसीच्या दुसर्‍या डोसनंतर जास्त प्रभावी ठरू शकते, अशा निष्कर्षापर्यंत आल्यामुळे लशींच्या दोन डोस देण्यामधील कालावधी वाढविण्याचा केंद्रीय निर्देश योग्य असल्याचे मत देशातील ज्येष्ठ व तज्ज्ञ डॉक्टरांनीही व्यक्त केले आहे. ही माहिती जनतेपर्यंत पोहोचेपर्यंत लोटलेल्या काळात काही ठिकाणी लस उपलब्ध होऊ शकली नाही, त्यामुळे लशीचा पुरवठा उशिराने का झाला? दोन डोसमधील कालावधी का वाढविला गेला? कमी वयोगटांतील लोकांना लस देण्याच्या निर्णयामुळे गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना लशीचा पुरेसा साठा शिल्लक राहणार का? दुसरा डोस घेण्याअगोदर एखादी व्यक्ती संक्रमित झाली, तर कोण जबाबदार? अशा शंका निर्माण झाल्या. समाजमाध्यमांवरून सध्याच्या काळात कोणत्याही विषयांवर शीघ्रतेने बातम्या पसरून काही गैरसमजुतीत भर पडत असते. याकरिता खबरदारी म्हणून केंद्र सरकारतर्फे कोरोना, लशीकरण वा तत्संबंधी उपाययोजनांवरील विविध खात्याकडून घेतले जाणारे निर्णय स्पष्ट व अधिकृत बातमीपत्रांच्या माध्यमांतून वृत्तपत्र आणि टीव्ही वाहिन्यांवरून जाहीर करावेत म्हणजे त्यांची विश्वासार्हता वाढेल.

राजन पांजरी, जोगेश्वरी.

लाख मोलाचा निर्णय !

टाटा कर्करोग रुग्णालयात उपचारासाठी देशभरातून येणार्‍या रुग्णांच्या गरीब, असाह्य नातेवाइकांना रुग्णालयाच्या परिसरात, पुलाखाली, पदपथावर उघड्यावर दिवस काढावे लागतात. हे दृश्यच मुळी केविलवाणे आहे. या पार्श्वभूमीवर जे यापूर्वीच मानवतेच्या भावनेतून व्हायला पाहिजे होते, या गंभीर परिस्थितीकडे लक्ष जायला पाहिजे होते ते झाले नाही. मात्र उशिराने का होईना हतबल झालेल्या, उघड्यावर अत्यंत गैरसोईत उपचारादरम्यान दिवस कंठणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाने शंभर घरे उपलब्ध करून देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य असून त्यांनी मानवतेचे फार मोठे कार्य केले आहे, यापुढे एकही रुग्णाचा नातेवाईक पथपथावर, उघड्यावर दिसणार नाही इतपत त्यांच्या उपचारादरम्यान राहण्याची सुविधा माणुसकीच्या नात्याने म्हाडाने पूर्ण करावी एवढीच अपेक्षा.

विश्वनाथ पंडित, ठाणे

मद्यपानासाठी शिथिलता

दिल्ली सरकारने नव्या अबकारी धोरणा अंतर्गत मद्य पिणार्‍यांचे वय कमी करून ते 25 ऐवजी 21 केले, अशी बातमी नुकतीच वाचली. वास्तविक आज अनेक युवक व्यसनाधीन होत आहेत. मद्याचे दुष्परिणाम तर आहेतच. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते शरीरास अपायकारक आहे. असे असतानाही मद्य पिणार्‍यांचे वय कमी करण्याचा सरकारचा निर्णय अचंबित करणारा आहे. नोएडा, तसेच उत्तर प्रदेशमध्ये असे या पूर्वीच केले आहे. विविध राज्यांत मद्य पिणार्‍यांचे कमीत कमी वय वेगवेगळे आहे. बिहार, गुजरात, तसेच नागालँड व लक्षद्वीपमध्ये दारूबंदी आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड व महाराष्ट्रात ते वय 25 आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश अंदमान व निकोबार, पाँडिचेरी, सिक्कीम, तसेच आंध्र प्रदेश व मिझोराममध्ये ते 18 आहे. केरळमध्ये ते 23 आहे. इतर काही राज्यात ते 21 आहे. एका बाजूला दिल्ली सरकारचा हा निर्णय होत असताना दुसरीकडे मात्र मद्याचे कोणतेही नवीन दुकान उघडले जाणार नाही, असे दिल्ली सरकारने ठरविले आहे. अलीकडेच एका बातमीनुसार मद्य पिणार्‍यांची संख्या वाढत चालली असल्याचे देशातील आकडेवारी सांगते. दिल्ली व इतर राज्यांच्या या निर्णयामुळे ती वाढण्याचीच दाट शक्यता आहे.

शांताराम वाघ, पुणे

बंधने फक्त महिलांनाच का?

गुडघ्यावर फाटलेले कपडे घालून महिला वावरतात, हे कसले संस्कार, असा प्रश्न उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांनी जाहीर कार्यक्रमात विचारला. त्यांच्या या जाहीर प्रश्नामुळे देशभर वादंग उठले होते. मुख्यमंत्री पदासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व राज्याचा प्रमुख असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. कोणी कोणते कपडे वापरायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणी गुडघ्यावर फाटलेली जीन्स फक्त महिलाच वापरतात का? पुरुषही फाटलेली जीन्स वापरतात, बर्मुडा किंवा शॉर्ट पॅन्ट घालून फिरतात; पण त्यांच्या कपड्यावर मात्र कोणीच आक्षेप घेत नाही. तिरथसिंग रावत हे ज्या संस्थेचे स्वयंसेवक आहेत त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेशदेखील हाफचड्डी व शर्ट हाच होता, हे ते विसरलेत का? बंधने फक्त महिलांवरच का? महिलांनी कोणते कपडे घालावेत हे ठरवण्याचा अधिकार यांना कोणी दिला? महिलांनी कोणते आणि कसे कपडे घालावेत, महिलांनी कोठे फिरावे, काय खावे, काय प्यावे हे पुरुषांनी ठरवावे ही तर मध्ययुगातील मानसिकता झाली.

श्याम ठाणेदार, दौंड, जि. पुणे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा