छोट्या व्यावसायिकांचा संतप्त सवाल
पुणे : निर्बंधाच्या निर्णयावर छोटे व्यापारी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर प्रकारची दुकाने बंद ठेवल्याने व्यापारासह व्यापार्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. एकीकडे दुकाने बंद असले, तरी दुसरीकडे मात्र दुकानाचे भाडे, वीजबिल, कर, कर्जाचे हप्ते सुरूच आहेत. दुकाने बंद ठेवून इतर खर्चासह किमान कर्जाचे हप्ते तरी कसे फेडायचे असा संतप्त सवाल छोटे दुकानदार व व्यावसायिक उपस्थित करीत आहेत.
येत्या 30 एप्रिलपर्यंत शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद असणार आहेत. महिनाभर दुकाने बंद राहिल्यास छोट्या व्यावसायिकांना प्रचंड मोठा तोडा सहन करावा लागणार आहे. त्यातून बर्‍याच व्यावसायिकांना सावरने अशक्य होणार आहे. जी दुकाने सुरू आहेत. ती दुकाने पोलिस जबरदस्तीने बंद करीत आहेत. काही दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा दंड वसूल करीत आहेत. एकीकडे बंदचा त्रास आहे, तर दुसरीकडे पोलिसांचा त्रास वाढला असल्याच्या तक्रारी छोटे व्यावसायिक करीत आहेत. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेऊन दुकाने सुरू ठेवण्यास व्यावसायिक तयार असल्याचेही ते सांगत आहेत.

परिस्थिती अंत्यत बिकट
थकलेली बीले भरून छोटे व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. मीठाई, फरसाण, किराणा दुकानांवर पोलिस कारवाईचा बडगा उगारत आहेत. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांची स्थिती बिकट आहे. दुकाने बंद झाल्याने व्यावसायिकांनी आता करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आमचा निर्बंधांना विरोध आहे. दुकाने सुरू ठेवण्यास परवानी दिली जावी. तसेच जबरदस्तीने दुकाने बंद करणार्‍या पोलिसांची हुकूमशाही थांबली पाहिजे. – सचिन निवंगुणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ.

व्यावसायिक अत्यंत वाईट स्थितीत
कोरोनाचा उद्रेक भयावह आहे. ते नाकारून चालणार नाही. मात्र कोरोनामुळे सुमारे दीड वर्षांपासून स्टेशनरी, कटलरी व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे कबंरडे मोडले आहे. कोरोनाने मरायचे की उपासमारीने असा प्रश्न छोट्या व्यावसायिकांच्या समोर निर्माण झाला आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून दुकाने सुरू ठेवण्यास व्यावसायिक तयार आहेत. कारण कर, दुकानाचे हप्ते, कामगारांचा पगार, घरखर्च आदी खर्च व्यापार्‍यांना भेडसावत आहे. पुन्हा त्यात दुकाने बंद झाल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यामुळे ते आर्थिक दडपणाखाली जगत आहेत. म्हणून नियम पाळून दुकाने सुरू करण्यात परवानगी मिळाली. – दिलीप कुंभोजकर, अध्यक्ष, स्टेशनरी कटलरी जनरल मर्चटस् असोसिएशन.

दुकाने पूर्ण वेळ बंद नको
संपूर्ण काळ दुकाने बंद ठेवल्याने आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. आर्थिक संकट दूर करण्यासाठी दुकाने पूर्ण वेळ बंद करू नका. तसेच व्यापार्‍यांना लस देण्यासाठी वयाची अट रद्द करा, व्यापार्‍यांसाठी लशीकरण मोहिम सुरू करा. आदी आमच्या मागण्या आहेत. सद्य:स्थितीत तुळशीबागेतील दुकानांची संख्या 300 इतकी आहे. आम्ही सरकारसोबतच आहोत. सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेऊन दुकाने सुरू ठेवू. – नितीन पंडित, अध्यक्ष, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन.

पार्सल सेवेतून भाडेही निघणार नाही
काही महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेशातून तिकीटांचे पैसे खर्च करून कामगारांना आणले आहे. माझे हॉटेल आहे, त्याचे भाडे 55 हजार आहे. एक लाख रूपये कामगारांचा पगार होतो. महिन्याचे सामान भरल्यास ते एक ते दीड लाखाचे होते. वीज बील आहे. कामगाराची खोली, जेवनाचा खर्च, हातमोजे, मास्क, सॅनिटायझरचा खर्च वाढला आहे. केवळ पार्सलसाठी हॉटेल सुरू आहेत. पार्सलला अत्याल्प प्रतिसाद आहे. त्यातून हॉटेलचे भाडेही मिळणार नाही. कामगारांना परत पाठवायचे म्हटले तरी गाड्या बंद आहेत. – नवनाथ सोमसे, हॉटेल व्यावसायिक.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा