नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा लाखाच्या घरात नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 96 हजार 982 नवे रुग्ण समोर आले. तर, 446 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

देशातील एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 26 लाख 86 हजार 49 वर पोहोचली. तर, बळींची संख्या 1 लाख 65 हजार 547 इतकी झाली. गेल्या 24 तासांत 50 हजार 143 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, आतापर्यंत 1 कोटी 17 लाख 32 हजार 279 जणांनी कोरोनावर मात केली. सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाख 88 हजार 223 वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.48 टक्के इतके असून मृत्युदर 1.32 टक्के इतका आहे.

सोमवारी रुग्णसंख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला होता. त्या तुलनेत काल रुग्णसंख्येत सहा टक्क्यांनी घट पाहायला मिळाली. गेल्या 24 तासांत 43 लाख 966 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. तर, आतापर्यंत 8 कोटी 31 लाख 10 हजार 926 जणांनी कोरोना लस घेतली.

केंद्राने पाठविली ५० पथके

देशात प्रामुख्याने महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब या तीन राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव जोराने फैलावत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 50 पथके पाठविली आहेत. महाराष्ट्रातील 30 जिल्हे, छत्तीसगडमधील 11 आणि पंजाबमधील 9 जिल्ह्यांत ही पथके तातडीने दाखल होणार आहेत. ही पथके राज्य सरकारच्या आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक क्षेत्रात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. गेल्या 25 दिवसांत कोरोना रुग्णसंख्या प्रतिदिन 20 हजारांवरुन एक लाखावर पोहोचली आहे. गेल्या वर्षी जवळपास 76 दिवसांनी म्हणजे 17 सप्टेंबर रोजी रुग्णसंख्येने विक्रमी 97 हजार 894 चा आकडा गाठला होता. मात्र, दुसरी लाट वेगाने फैलावत असल्याचे जाणवत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल 11 राज्यांतील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करीत कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, दिल्ली, गुजरात, हरयाना, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्तानचा समावेश आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा