सलग २२ एकदिवसीय सामन्यांत नोंदवला विजय

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड महिला क्रिकेट संघादरम्यान झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझिलंडवर सहा फलंदाज राखून विजय मिळवला आणि सलग 22 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विश्वविक्रम नावावर केला. याचसोबत, तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने केलेला हा विश्वविक्रम पुरुषांच्या संघालाही आतापर्यंत जमला नाही. या आधी सलग 21 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या नावावर होता, तो आता ऑस्ट्रेलियाच्याच महिला क्रिकेट संघाने मोडला आहे.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची ही विजयाची मालिका 12 मार्च 2018 ला सुरू झाली होती. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान विरोधात ऑस्ट्रेलियाच्या संघाने 3-0 अशा दोन मालिका जिंकून या विश्वविक्रमाकडे वाटचाल केली होती. या सामन्यातील त्यांचा हा 22 वा विजय आहे.

या सामन्यात न्यूझिलंडने नानेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 48.5 षटकात 212 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात काहीशी खराब झाली. पण एलिसा हिली, एलिस पॅरी आणि अ‍ॅशलेग गार्डनरच्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने हे लक्ष केवळ 39 व्या षटकातच साध्य केलं आणि न्यूझिलंडवर सहा गडी राखून विजय मिळवला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा