आयपीएमध्ये सर्वाधिक बळी घेऊनही भारतीय संघात स्थान नसल्याने मिश्रा निराश

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक बळी मिळवूनही भारतीय संघात मला जागा नाही. मी यापेक्षा जास्त काय करु शकतो?, असा उद्विग्न सवाल दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्राने उपस्थित केला आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्याला आता केवळ तीन दिवस उरले आहेत. अशातच मिश्राने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

गेल्या चार वर्षांपासून अमित मिश्रा भारतीय संघाबाहेर आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्याला निवड समितीने डावलले आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍यांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर असून देखील त्याच्या नशिबी गेल्या चार वर्षांपासून भारतीय संघात खेळण्याचा योग नाही. भारताकडून अमित मिश्रा 2017 साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आयपीएल तोंडावर असताना त्याने आपल्या मनातली खंत व्यक्त करत नेमक्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

अमित मिश्रा म्हणाला, आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत मी दुसर्‍या स्थानी आहे. यापेक्षा मी यापेक्षा आणखी कसली कामगिरी करु? मोठ्या स्पर्धेत माझी कामगिरी चांगली राहिली आहे. चांगली कामगिरी करणे माझे काम आहे. ते मी गेल्या अनेक वर्षांपासून करतोय. अशा काळात लोक माझ्याबद्दल काय विचार करतायत, याचा मला फरक पडत नाही.

एका चांगल्या लेग स्पिनर्सला एका चांगल्या कर्णधाराची गरज असते की जो त्याला समजून घेईल. ज्यावेळी त्याच्याविरोधात फलंदाजाची बॅट बोलत असते त्यावेळी संबंधित कर्णधाराने गोलंदाजाला समजून घेऊन त्याच्या पाठीमागे भक्कमपणे थांबायला हवे, त्याला धीर द्यायला हवा. साहजिक त्याने लेग स्पिनर्सची मानसिकता समजून घ्यायला हवी, असेही अमित मिश्रा म्हणाला.

यंदाचा आयपीएल हंगाम अमित मिश्रासाठी शेवटचा हंगाम ठरु शकतो. कारण सध्या अमित मिश्राचे वय वर्षे 38 आहे. हे वय एखाद्या खेळाडूचे खूप जास्त मानले जाते. तसेच आजच्या क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहान दिले जाते. त्यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम अमित मिश्रासाठी शेवटचा हंगाम असेल, अशी चर्चा आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांमध्ये अमित मिश्रा दुसर्‍या स्थानी आहे. मुंबईकडून खेळणार्‍या लसीथ मलिंगाच्या नावावर 170 बळी आहेत. त्याच्या खालोखाल अमित मिश्राने 150 आयपीएल सामन्यांमध्ये 160 बळी मिळवले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा