अशोक राणे, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक

रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलेली बरीच नावं भारतीय चित्रसृष्टीत आहेत. त्यातही रजनीकांत हे नाव अग्रक्रमानं घ्यावं असं आहे. या सदाबहार अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. चित्रसृष्टीतल्या या सर्वोच्च पुरस्कारानं होणार्‍या गौरवास रजनीकांत पूर्णपणे पात्र आहे.

चित्रसृष्टीत अनेक कलाकार प्रवेश करतात. पण चित्रसृष्टीत असेही काही कलाकार आहेत जे एकाच नव्हे तर बर्‍याच पिढ्याचं मनोरंजन करत राहतात आणि आपल्या कामाचा असा काही दबदबा निर्माण करतात की त्यांचं नाव हाच एक ब्रँड होऊन जातो. ‘सुपरस्टार’ रजनीकांत हा असाच एक अभिनेता आहे.

एका वाक्यात सांगायचं तर रजनीकांत हा रजनीकांत आहे. त्याच्यासारखं काम कोणीच करत नाही आणि करुही शकणार नाही. असं एकमेवाद्वितीय असणं हीच त्याची ओळख आहे. हा अभिनेता एका स्टाईलमध्ये काम करणारा आहे. व्यावसायिक चित्रपटांमध्ये स्टार म्हणून काम करताना तुम्हाला स्टाईलमध्येच काम करावं लागतं. अथार्र्तच त्यासाठी आधी तुमची स्टाईल बनवावी लागते. इतर उदाहरणार्थ नसीरुद्दीनसारख्या नटांना याची गरज भासत नाही. व्यक्तिरेखा मिळते तसं ते काम करतात. त्यांना एखादी व्यक्तिरेखा पटली नाही तर ते काम स्वीकारणार नाहीत.

एकीकडे अभिनेत्यांचा हा वर्ग असताना दुसरीकडे रजनीकांतसारख्या स्टार अभिनेत्यांचाही एक वर्ग असतो ज्यांना लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखाच करायच्या असतात, अथवा त्यांना त्या कराव्या लागतात. तशी व्यक्तिरेखा नसल्यास रजनीकांत अथवा अमिताभ यांच्यासारखे नट ती भूमिका स्वीकारणार नाहीत कारण ते स्टार अ‍ॅक्टर आहेत. याचा अर्थ ते अभिनेता म्हणून चांगले नाहीत असं अजिबात नाहीत. ते उत्तम अभिनेता आहेतच, पण काही लोक आपल्याच प्रतिमेचे बळी बनतात तसं त्याचं झालं आहे. अर्थातच व्यावसायिक चित्रपटांच्या रेट्यात रजनीकांतला ही प्रतिमा जाणिवपूर्वक बनवावी लागली आणि पुढे रसिकांच्या रेट्यामुळे टिकवावी लागली. पण पुढे तो याच प्रतिमेत अडकला.

त्याच्या या प्रतिमेवर देशातल्याच नव्हे तर जगभरातल्या रसिकांनी उदंड प्रेम केलं. तो जपानमध्ये तर प्रचंड लोकप्रिय आहे. याचा एक अनुभव सांगतो. एकदा मी जर्मनीतल्या स्टुटगार्ड फिल्म फेस्टिव्हलला गेलो होतो. तिथे मूळ जपानची पण अमेरिकेत राहणारी दोन मुलं त्यांची ‘रजनी’नावाची चित्रपट नावाचा घेऊन आली होती. नावावरुन मला काही उलघडा होईना. पण उत्सुकता चाळवली. त्यामुळे चित्रपट पाहिला. त्या चित्रपटाची कथा अशी होती की, जपानमध्ये बारीकसारिक कामं करुन उदरनिर्वाह करणार्‍या एका मुलाला चित्रपट बनवायचा असतो आणि त्यात त्याला स्वत:ला रजनीकांत व्हायचं असतं. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तो धडपडत असतो पण ही धडपड आईपासून लपवतही असतो. या प्रयत्नात तो आपल्या साठीच्या घरातल्या मामाची मदत घेतो. या मामालाही चित्रपटाचं वेड असतं. तो चांगले फोटोही काढत असतो. त्यामुळेच हा मुलगा आपल्या मामाला कॅमेरामन बनवतो आणि इकडून तिकडून जमवाजमव करुन कसाबसा चित्रपट पूर्ण करतो.

दरम्यान आईला संशय येत असतो. पण तो तिच्यापासून दडवून ठेवण्यात यशस्वी होतो. सरतेशेवटी चित्रपट पूर्ण होतो आणि प्रदर्शनाचा शो लागतो. यावेळी मात्र तो आईला घेऊन जातो. प्रदर्शनाच्या त्या शो मध्ये चित्रपटाचं खूप कौतुक होतं. त्या मुलावर शुभेच्छांचा वर्षाव होतो. ते सगळं पाहून आई आनंदून जाते. ते पाहून तो आईला विचारतो, इतकी वर्ष तू मला चित्रपटविश्वापासून दूर का ठेवलं? तेव्हा ती उत्तरते, तुझे वडीलदेखील त्या रजनीकांतचे जबरदस्त चाहते होते, त्याच्या कामाचे वेडे होते. त्या वेडेपणात त्यांनी पैसा घालवला आणि आपली ही दुर्दशा झाली. तुझ्याबाबतीत हे व्हायला नको म्हणून मी तुला चित्रसृष्टीपासून दूर ठेवत होते. अशाप्रकारच्या कथेवर आधारित त्या मुलांचा चित्रपट रजनीकांतची जपानमधली विलक्षण लोकप्रियता दाखवून देण्यास पुरेसा आहे असं म्हणावं लागेल.

रजनीकांतला अशी देशाविदेशात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. लौकिक मिळाला. पण ही प्रसिद्धी कधीही त्याच्या डोक्यात गेली नाही. त्याच्यातला सामान्य माणूस कधीही दूर गेला नाही. आजही तो त्याच्याजवळच आहे. याचं अगदी साधं उदाहरण द्यायचं तर चित्रपटात भूमिकेची गरज म्हणून तो मेकअपचे सगळे सोपस्कार पाळतो. विग घालतो. बरेचसे कलाकार पडद्यावरची प्रतिमा डागाळण्याच्या भीतीनं प्रत्यक्षातही तशाच रुपात वावरण्याचा प्रयत्न करतात. वाढत्या वयाच्या प्रभावानं डोक्याचे केस गेले तरी टोेप लावून फिरतात. पण ‘स्टार’ रजनीकांतनं कधीच रसिकांपासून आपलं खरं रुप लपवलं नाही. पडद्याबाहेरची त्याची इमेज अतिशय साधी आहे. लुंगी नेसलेला, डोक्यावरचा अर्धचंद्र बिनदिक्कत मिरवणारा कोणताही साधा अण्णा वाटावा असा तो एरवी बिनधास्त फिरतो. त्यात त्याला कसलीही भीती वाटत नाही. म्हणूनच एरवी सामान्य माणसासारखं राहूनही पडद्यावरच्या प्रतिमेला धक्का पोहोचत नाही हे या स्टार कलाकारानं सिद्ध करुन दाखवलं आहे. माझ्या मते, आजवर असं धाडस करणारा हा पहिलाच स्टार कलाकार असावा. विशेष म्हणजे त्यानं हे सिद्ध केलं असलं तरी आजवर कोणाही स्टार कलाकाराची त्याच्यासारखं आहे तसं रसिकांसमोर येण्याची हिंमत झालेली नाही; पण रजनीकांत तसा नाही. तो आहे तसा राहतो.

मी ऐकलेली एक गोष्ट अशी की, रजनीकांत कंडक्टर असताना त्याचा एक जिवाभावाचा मित्र होता. तो मित्रही कंडक्टरच होता. त्या दोघांची मैत्री आजही तितकीच घट्ट आहे. रजनीकांत आजही आपल्या या मित्राकडे हक्कानं दोन-चार दिवस रहायला जातो आणि त्याच्या साध्या घरात साधं खाऊन-पिऊन एकत्र दिवस घालवतो. त्याच्या आड कुठेही त्याचं स्टारपण येत नाही. इमेज जपण्याच्या आणि त्याच्या आहारी जाणार्‍यांच्या भाऊगर्दीत रजनीकांतचं हे व्यक्तिविशेष उठून दिसण्याजोगं आहे.

स्टार म्हणून रजनीकांत खूपच मोठा आहे. तो स्वत: कॅरेक्टर डिझाईन करतो. तोच नव्हे तर सगळेच स्टार कलाकार आपापलं कॅरेक्टर डिझाईन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. केवळ लेखक अथवा दिग्दर्शकावर न सोपवता ते स्वत: त्यात लक्ष घालतात. रजनीकांतदेखील याला अपवाद नाही. म्हणूनच त्यानं इंडस्ट्रीला आपली खास अशी एक इमेज दिली आहे. आपल्या पद्धतीचे चित्रपट दिले आहेत. अमिताभ बच्चन देखील अ‍ॅक्शन करतो. पण त्यानं रजनीकांतसारखे अ‍ॅक्शनपट केले तर ते खोटे वाटतील कारण रजनीकांतनं ती स्टाईल प्रयत्नपूर्वक निर्माण केली आणि रुजवली आहे.

कुठल्याशा चित्रपटात रजनीकांतच्या बंदुकीत एकच गोळी असते आणि डावीकडे एक आणि उजवीकडे एक अशा दोन बाजूला थांबलेल्या व्हिलनचा त्याला खात्मा करायचा असतो. मग तो गोळी आकाशात उडवतो आणि त्याचवेळी हातातली सुरी वर टाकतो. त्या सुरीनं बंदुकीच्या गोळीचे दोन तुकडे होतात. एक तुकडा उजवीकडच्या माणसाला लागतो आणि दुसरा तुकडा डावीकडच्या माणसाला लागतो. दोघेही मरतात… हा नॉनसेन्स अथवा फॅन्टसीचं अंतिम टोक सुचणं देखील अवघड आहे. हे त्यालाच सुचू शकतं आणि त्याचा सिनेमा करणार्‍यांनाच सुचू शकतं.

एकंदर काय तर रजनीकांत काहीही करु शकतो आणि त्याला काहीही करताना प्रेक्षक बघू शकतो. त्याचा आनंद घेऊ शकतो. त्यात रमू शकतो आणि पैसे वसूल झाल्याचा आनंद घेत चित्रपटगृहाबाहेर पडू शकतो. त्याच्या चित्रपटांमधून कोणाला कुठला संदेश वगैरे नको असतो. तो लोकांना लार्जर दॅन लाईफच हवा असतो… कारण तो आहेच तसा!

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा