70 टक्क्यांनी प्रवासी घटले; 40 टक्के फेर्‍या सुरू
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शहरात सुरू असलेल्या कडक निर्बंधामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत सुमारे 70 टक्क्यांनी घट झाली आहे. प्रवासी उपलब्ध होत नसल्याने एसटी प्रशासनाने प्रमुख मार्गावरील बसच्या सुमारे 60 टक्के फेर्‍या रद्द केल्या आहेत. केवळ 40 टक्के फेर्‍या सुरू असल्याचे एसटी प्रशासनातर्फे मंगळवारी सांगण्यात आले.
पुण्यासह पुणे विभागातील अनेक महत्त्वाच्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. तसेच मुंबई आणि परिसरातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या बहुतांश शहरात प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बससेवा सुरू असली, तरी प्रवाशांसाठी मात्र बस स्थानकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शहरातील विविध बस स्थानकातून सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, कल्याण, ठाणे, बोरिवली, दादर, नाशिक, नगर, औरंगाबाद, सोलापूर या महत्त्वाच्या मार्गावरील फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.
कडक निर्बंध असले, तरी महत्त्वाच्या कामानिमित्त निघालेल्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बस सेवा सुरूच ठेवण्यात आली आहे. एखाद्या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढल्यास नियोजित फेर्‍यासह त्या मार्गावर मागणीनुसार बस सोडल्या जात आहेत. बस स्थानकात योग्य त्या खबरदारीबाबत प्रवाशांना सूचना केल्या जात आहेत. प्रवासातही मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. सॅनिटायझरचा वापर करण्याबाबतही वाहक प्रवाशांना सूचना करीत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून प्रवाशांना वाहतूक सुविधा पुरविण्यात येत असल्याचेही एसटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.


रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ
पुण्यासह राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा आहे. सध्या राज्यात कडक निर्बंध सुरू आहेत. रोजगारानिमित्त विविध राज्यांतून पुण्यात आलेला कामगार वर्ग धास्तावला आहे. लॉकडाऊनच्या भीतीने हे कामगार आपापल्या गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. पुणे रेल्वे स्थानकातही गर्दी वाढली आहे. मात्र धावणार्‍या गाड्यांची संख्या अद्यामही मर्यादित असल्याने तिकीट आरक्षित झालेल्या प्रवाशांनाच रेल्वेतून प्रवासाला मुभा देण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा