पुणे : पुण्यातील बुधानी बटाटा वेफर्सचे मालक राजूशेठ चमनशेठ बुधानी यांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. बुधानी यांची ‘बटाटा वेफर्स’ उद्योजक अशी सर्वदूर ओळख होती. पुण्यात नव्हे, तर परदेशातही ते बटाटा वेफर्ससाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी बनविलेल्या वेफर्सला देशासह परदेशातूनही मोठी मागणी आहे.
राजू यांचे मोठे चुलते बाबू यांनी 55 वर्षांपूर्वी महात्मा गांधी रस्त्यावरील पुना ड्रग्स् स्टोअर शेजारी छोट्या दुकानात बटाटा वेफर्स विक्री व्यवसाय सुरू केला होता. गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास वाढवत त्यांनी पुण्याबरोबर महाराष्ट्रातून परदेशात वेफर्स विक्री सुरू केली. राजू बुधानी यांनी मोठ्या प्रमाणात वेफर्सचा व्यवसाय वाढवला. सद्य:स्थितीत महात्मा गांधी रस्त्यावरील तीन मजली इमारतीमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून मोठ्या प्रमाणावर बटाटा वेफर्स आणि इतरही खाद्य पदार्थांची निर्मिती करून विक्री केली जाते.
बटाटा वेफर्सचे एक नव्हे, दोन नव्हे चक्क दहाहून अधिक प्रकार त्यांच्या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी मोठ्या प्रमाणात जोपासली आहे. गोरगरिबांना मदत करण्यासाठी त्यांचा हात पुढे होता. ताबूत स्ट्रीटवरील ताबूत स्ट्रीट ताजिया कमिटी आणि ताबूत स्ट्रीट तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची अनेक संस्था आणि संघटनांनी दखल घेऊन त्यांना गौरविले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा