कोरोनाचा हाहाकार; ४७८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिकच धोकादायक ठरत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे एक लाखांवर अधिक रुग्ण आढळून आले. देशात प्रथमच लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील कोरोना स्थिती बिकट बनली आहे. वाढती कोरोनासंख्या आणि मृत्यू सरकार आणि प्रशासनासाठी मोठ्या चिंतेचा विषय बनला आहे.

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 3 हजार 558 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 25 लाख 89 हजार 67 वर पोहोचली. मागच्या 24 तासांत 52 हजार 847 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 82 हजार 136 रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 478 बळी गेले. तर, आतापर्यंत 1 लाख 65 हजार 101 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाख 41 हजार 830 वर पोहोचली आहे. तर, देशात आतापर्यंत 7 कोटी 91 लाख 5 हजार 163 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण किंचित घटले असून सध्या हा दर 92.80 टक्के इतका आहे. तर, मृत्युदर 1.31 टक्के इतका आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात 17 सप्टेंबर रोजी 97 हजार 894 सर्वाधिक रुग्ण आढळले होते. त्यानंतर, काल प्रथमच एक लाखांहून अधिक रुग्ण समोर आले. जवळपास सहा महिन्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. शिवाय, कुटुंबातील एका व्यक्तीला संक्रमण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबालाच विषाणूची लागण होत असल्याचे आढळून आले आहे.

देशात सक्रिय रुग्णांची संख्या सात लाखांवर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णसंख्या 12 फेब्रुवारी रोजी 1 लाख 35 हजार 926 पर्यंत खाली आली होती. मात्र, अवघ्या दीड महिन्यांत सक्रिय रुग्ण संख्या सात लाखांवर पोहोचली आहे. गेल्या 26 दिवसांत त्यात मोठी भर पडली.

महाराष्ट्रात पंधरा दिवसांत तब्बल 4 लाख 27 हजार 108 नव्या रुग्णांची भर पडली. तर, पंजाबमध्ये 35 हजार 754 रुग्ण आढळून आले. कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि हरयानातही कोरोना रुग्णांची भर पडत आहे.

गेल्या 24 तासांत 478 जणांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील 122 जणांचा समावेश आहे. पंजाबमध्ये 51 आणि छत्तीसगडमध्ये 36 जणांना प्राण गमवावे लागले.
महाराष्ट्रात शनिवार, रविवार लॉकडाउन करण्यात आला आहे. तसेच, दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय, अनेक कठोर निर्बंध करण्यात आले आहेत.

राजस्तानमध्ये कोरोना चाचणीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय, नववीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांना रात्रीची संचारबंदी लागू करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असणार आहे. राज्यात रात्री आठ ते सकाळी सहा यावेळेत संचारबंदी असणार आहे. हरयानातदेखील नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडमध्ये केंद्रीय पथके पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये आरोग्य तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा