जीवन अध्यात्म : डॉ. जगन्नाथ श्यामराव पाटील

कर्म निष्काम म्हणजे कामनारहित, निर्लीप्त, निरीच्छ, आसक्ती नसलेले, फळाची अपेक्षा न ठेवणारे. अनेक अर्थाने निष्काम या शब्दाकडे पाहता येईल. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोगाचे महत्त्व, स्वरूप सांगीतले आहेच. समाजामध्ये सहजतेने निष्काम कर्मयोग करणारे लोक बहुसंख्येने आहेत. जे निष्काम कर्म करीत आहेत आणि त्यांना आपण काही विशेष करीत आहोत असे वाटत पण नाही. गरजुला पाणी, जेवण, सहकार्य करून विसरून जाणारे, खूप लोक आहेत. प्रवासात एकमेकांना सहज सहकार्य करून आपापल्या ठिकाणी सर्वजण निघून जातात. पुन्हा आपण कधीतरी, कोणालातरी मदत केली होती हे लक्षात सुद्धा येत नाही.

लहान-लहान कर्मे करताना येणारी निष्कामता मोठ्या कामात येत नाही. तेथे मात्र फळाची अपेक्षा राहाते. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती कामना कधी करायची आणि कधी सोडून द्यायची याचे भान ठेवून जगत असतो.

कित्येक शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधामुळेच आपण एकमेकांच्या जवळ आलो आहोत. फोन, कॉम्प्युटर, विविध यंत्रे, ए.सी., पंखे, फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशीन, लाईट, बल्ब, गाड्या, इंजीन असे कितीतरी संशोधन लोकांना सुखकर जीवन जगण्यास संयुक्त झाले. आज त्यांची नावे सुद्धा समाजाला माहीत नाहीत. त्यांनी शोध लावले आणि कृष्णार्पण केले. हा निष्काम योग आहे. निष्काम प्रेम, सहकार्य, दान, कर्म अगदी भक्ती सुद्धा कामनारहित असली पाहिजे. जसा व्यवहार केला जातो, तसा व्यवहार देवाबरोबर होऊ शकत नाही. नवस बोलून, साकडे घालून भक्ती होत नसते. निष्काम भक्ती, निष्काम कर्म या दोन्हीवर संपूर्ण आध्यात्म अवलंबून आहे. मुक्या प्राण्यांची सेवा, दीन-दुबळे, अनाथ, अधु, अपंग, गरजु यांची मदत करणारे खूप लोक आपले नावसुद्धा कुठे जाहीर होऊ देत नाहीत. ते निष्काम कर्म. ते लक्षात सुद्धा ठेवणे योग्य नाही. अशी निष्काम भक्ती, कर्म ही साधने मार्ग मोकळा करून देतात. ही खूप उच्चकोटीची अवस्था आहे. या अवस्थेमधून साधक पुढे जाऊन सिद्ध होऊ शकतो. आपण सर्वजण अशा निष्काम कर्म, भक्ती करण्याची आपली वृत्ती निर्माण करू. किमान यासाठी प्रयत्न करू.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा