मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही अनेक नवोदित खेळाडू चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. आयपीएल सुरू होण्याआधी पंजाब किंग्सचे प्रशिक्ष अनिल कुंबळे यांनी संघातील युवा फलंदाज खानचे कौतुक केले आहे. शाहरुख खानमध्ये आपल्याला वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डची झलक दिसते, असे अनिल कुंबळे म्हणाले आहेत. कुंबळेनी मुंबई इंडियन्सच्या नेटमध्ये पोलार्डला गोलंदाजी केली आहे. शाहरुखमध्येही पोलार्डसारखीच क्षमता असल्याची प्रतिक्रिया कुंबळे यांनी दिली आहे.

’शाहरुख खानला बघितल्यावर मला पोलार्डची आठवण येते. जेव्हा मी मुंबई इंडियन्समध्ये होतो तेव्हा पोलार्ड नेटमध्ये धोकादायक होता. जेव्हा मी गोलंदाजी करायचो तेव्हा त्याला सरळ फटके मारू नको, असे सांगायचो. शाहरुख नेटमध्ये फलंदाजी करत असताना मी त्याला गोलंदाजी करणार नाही. आता मो वय झाले आहे, तसेच शरीरही साथ देत नाही,’ असे कुंबळे म्हणाले.

कुंबळेकडून होत असलेले कौतुक पाहून शाहरुखही खूश झाला. कुंबळेनी हे बोलणे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पंजाबच्या सहकार्‍यांशी मी खूप बोलतो, यातून मला शिकण्याची संधी मिळते, असे वक्तव्य शाहरुखने केले.

शाहरुख स्थानिक क्रिकेटमध्ये तामीळनाडूकडून खेळतो. यावेळच्या आयपीएल लिलावात त्याला पंजाब किंग्सने 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची बेस प्राईज 20 लाख रुपये होती, म्हणजेच पंजाबने शाहरुखसाठी 20 पट जास्त किंमत मोजली. शाहरुखला विकत घेण्यासाठी पंजाब, दिल्ली आणि बंगळुरु यांच्यात जोरदार स्पर्धा झाली.

पंजाबने लिलावात विकत घेतल्यानंतरही शाहरुख खूश झाला होता. ’लिलाव सुरू झाला तेव्हा मी इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये सराव करत होतो. लिलावात जेव्हा माझे नाव येईल तेव्हा मला सांग, असे मी फिजियोला सांगितले होते. पण सराव करत असताना माझे नाव आले नाही. सराव संपवून मी बसने हॉटेलमध्ये गेलो, तेव्हा लिलावात माझे नाव पुकारले गेले आणि माझ्या छातीत धडधडायला लागलं,’ असे शाहरुख म्हणाला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा