प्रेमी युगुलाच्या प्रेमात बिब्बा घालणारी तरुणी ही त्यांची पडद्यावरील प्रतिमा बनली. नायकाचे प्रेम जिंकण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाणे ही अशा भूमिकांची खासियत.

ज्या – ज्या मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत लक्षणीय यश मिळवले त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचा समावेश होतो. त्यांची दीर्घ कारकीर्द चमकदार होतीच; पण त्याहून अधिक पडद्यावरील त्यांच्या प्रतिमेची चमक होती. ही प्रतिमा खलनायिकेची. अजित, प्राण, प्रेम चोप्रा वगैरे कलाकार खलनायक म्हणून गाजत असताना खलनायिकेची जागा वर्षानुवर्षे शशिकला यांनी कायम राखली. गेल्या शतकात 1940 नंतरच्या काळात हिंदी चित्रपट क्षेत्रात डोळे दिपाविणारे, थक्क करणारे जे घडले ती एक अद्भूत कथा ठरली आहे. त्या काळाशी शशिकला जोडल्या गेल्या होत्या. नूरजहाँ यांच्या ‘झीनत’ चित्रपटातील गाजलेल्या कव्वालीतून शशिकला यांचे पडद्यावर पदार्पण झाले. प्रयत्नपूर्वक त्या उर्दू शिकल्या. त्यांच्याकडे सौंदर्याची निसर्गदत्त देणगी होतीच, अभिनय कौशल्य होते. तो त्यांच्या यशस्वी वाटचालीचा पाया ठरला. प्रारंभीच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी नायिकेची भूमिका केली आहे. केदार शर्मा यांच्या ‘ठेस’ चित्रपटात त्या सर्वप्रथम नायिका बनल्या. व्ही. शांताराम यांनी ‘तीन बत्ती चार रास्ता’, ‘सुरंग’ मध्ये दिलेली संधी त्यांच्या क्षमतेला मिळालेली पावतीच होती. अमिया चक्रवर्ती, पी.एन. अरोरा अशा त्यावेळच्या मोठ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. रुप आणि अभिनयगुण असून देखील नायिका म्हणून शशिकला यांचे बस्तान बसू शकले नाही.

खलनायिकाही साकारल्या

नायिका म्हणून दुय्यम दर्जाचे चित्रपट त्यांच्या वाट्याला येऊ लागले. एकप्रकारे ही कोंडी होती. त्या दरम्यान सहनायिकेच्या भूमिकाही त्यांनी केल्या. बिमल रॉय यांच्या ‘सुजाता’ या गाजलेल्या चित्रपटात नूतन यांच्या बहिणीची त्यांनी केलेली भूमिका सरस होती. ‘अनुपमा’ या चित्रपटातील त्यांची खेळकर भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. मात्र प्रेक्षकांच्या अधिक करून लक्षात राहिल्या त्या शशिकला यांनी साकारलेल्या खलभूमिका. कलाकार पडद्यावरची आपली प्रतिमा जपण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. नायक, नायिका याशिवाय अन्य भूमिका त्यांना जोखीम वाटते. अशावेळी शशिकला यांनी खलनायिकेच्या व्यक्तीरेखा साकारण्याचा निर्णय घेतला. तो धाडसी होता; पण याच निर्णयाने त्यांना भरभरून यश दिले आणि त्यांना दीर्घ वाटचाल करणे सुकर ठरले. प्रेमी युगुलाच्या प्रेमात बिब्बा घालणारी तरुणी ही त्यांची पडद्यावरील प्रतिमा बनली. नायकाचे प्रेम जिंकण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाणे ही अशा भूमिकांची खासियत. अर्थात, यातून कथानकात रंग भरत असे आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढत जात असे. अशा भूमिकांमध्ये शशिकला तरबेज झाल्या. ‘आरती’ या फणी मुजुमदार दिग्दर्शित चित्रपटापासून खलनायिका म्हणून त्यांचे नाव होत गेले. मीनाकुमारी यांच्या दुष्ट नणंदेची भूमिका शशिकला यांनी त्यात केली होती. अशोककुमार, सुनील दत्त यांच्या ‘गुमराह’ मध्ये चावी फिरवत नायिकेवर दहशत निर्माण करणार्‍या तरूणीची भूमिका प्रेक्षकांना आवडली. हरियाली और रास्ता, ये रास्ते हैं प्यार के, हिमालय की गोद में, भीगी रात, हमराही, नीलकमल, घराना, फूल और पत्थर यांसह शेकडो चित्रपटांमधून त्या चमकल्या. ‘हमजोली’ सारख्या चित्रपटात त्या प्राण यांच्यासमोर ताकदीने उभ्या राहिल्या. मराठीत महानंदा, लेक चालली सासरला हे त्यांचे ठळक चित्रपट. मराठीत त्या रमल्या नाहीत. मात्र हिंदी – उर्दू भाषकांचे प्राबल्य असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत सोलापूरच्या एका मराठी कन्येने यशाचा झेंडा फडकावला हे विसरता येणार नाही. शशिकला मोहनगरीत वावरल्या; पण जीवनाचे वास्तव विसरल्या नाहीत. मदर तेरेसांच्या सहवासात आणि विपश्यना साधनेत त्यांना मानसिक शांतीचा अनुभव येत असे. इगतपुरीतील रुग्णालयात त्यांनी रुग्णसेवा देखील केली. हसतमुख चेहरा आणि लाघवी बोलणे हे शशिकला यांचे वैशिष्ट्य. प्रसन्नतेचा शिडकावा करणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. उत्साह, चैतन्य यांनी फुललेल्या व्यक्ती कमी संख्येने पहायला मिळतात. वृद्धत्वाचा स्पर्श त्यांना झाला नाही. आयुष्यभर त्यांनी तजेला जपला. त्यांनी साकारलेल्या भूमिकाही कायम तजेलदार राहणार आहेत. आपल्या व्यक्तिमत्त्वातील चैतन्याचा रंग त्यांनी भूमिकांना दिला. काळ कोणताही असो, हिंदी चित्रपटांवर प्रेम करणार्‍या कोणालाही शशिकला या नावाचा विसर पडणार नाही!

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा