जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या फखर झमानने ऐतिहासिक खेळी रचली. फखरने 18 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 193 धावा केल्या. या उत्तम खेळीसोबतच फखर झमानने ऑस्ट्रेलियाच्या शेन वॅटसनचा विक्रमही मोडला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वोत्तम धावांचा विक्रम पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानच्या नावावर जमा झाला आहे.

यापूर्वी आव्हानाचा पाठलाग करतानाच्या सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम शेन वॅटसनच्या नावावर होता. वॅटसनने 2011 मध्ये 230 धावांचा पाठलाग करताना 96 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने 185 धावांची नाबाद खेळी केली होती.

पण दक्षिण आफ्रिकाविरुद्ध फखर झमानने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात शानदार खेळी केली. फखरने 155 चेंडूत 18 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 193 धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना फखर झमान एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसरे द्विशतक करण्यापासून वंचित राहिला.

रोहित शर्माशी बरोबरी

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 190 पेक्षा जास्त धावसंख्येच्या दोन खेळी करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके केली आहेत; पण आता फखर झमान दुसरा असा खेळाडू बनला आहे, ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसर्‍यांदा एका डावात 190 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

फखरने यापूर्वी एक द्विशतक झळखावले आहे. फखरने झिम्बॉब्वेविरोधात 210 धावांची खेळी रचली होती. ही दुसरी वेळ होती, जेव्हा त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 190 धावांपेक्षा जास्त धावांची खेळी रचण्यास यश आले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा