संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै

नामस्मरणाचा अभ्यास शिकविताना नामनामी अभेद असे संत सांगतात पण नाम व नामी अभेद केव्हा? रस्त्यावरचा भिकारीसुद्धा राम राम म्हणतो तेव्हा नाम व नामी अभेद नाही. हा विषय लोकांना कळत नाही. परमार्थ या विषयांत लोक वावर करतात पण त्यांना परमार्थाचे रहस्य त्यांना कळत नाही व परमार्थाबद्दलचे स्वारस्य त्यांना वाटत नाही. जीवनविद्या परमार्थाचे रहस्य सांगते व त्यातले स्वारस्य ही समजावते. जीवनांत उद्भवणाया प्रश्नांची उकल करण्यासाठी जीवनविद्या नेहमी का हा प्रश्न विचारायला सांगते. माणूस हा समाजात रहाणारा प्राणी आहे आणि आपण ज्याला यशस्वी जीवन म्हणतो त्यात सुख, शांती, समाधान सर्व आलेच. असे यशस्वी जीवन सर्वांना का प्राप्त होत नाही? जगांत दुःख का? का हा प्रश्न विचारू लागलात की चिंतनाची सवय लागते. चिंतनाची सवय जडली की बहिर्मन व अंतर्मनाचा संबंध जोडला जातो. सर्व असूनही माणसे एकमेकांशी भांडतात. माणसाकडे हाव व धाव या दोन्ही गोष्टी आहेत. हाव व धाव ही जीवनाची चाके झालेली आहेत. हाव ज्या गोष्टींसाठी आहे ती मिळविण्यासाठी धाव चाललेली आहे. हाव याचा अर्थ हवेपणा. काहीतरी हवे असते, काहीतरी पाहिजे असते हयाला हवेपणा म्हणतात. या हवेपणालाच वासना, कामना, आकांक्षा ही नांवे दिलेली आहेत. हे लक्षांत घेतले तर आपल्या जीवनांत दुःख का याचे कारण ही हाव व धाव. हा हवेपणा मुळांत प्रेरणा आहे हे ही लक्षांत घेतले पाहिजे. हा हवेपणा प्रेरणा असल्यामुळे ते वाईट नाही. आपल्या ठिकाणी असलेली इच्छा, कामना ही प्रेरणा आहे. ही प्रेरणा म्हणजेच स्फुरण आहे. हे स्फुरण दाबण्याचा प्रयत्न केला तरी दाबता येत नाही. दाबण्याचा प्रयत्न केला तर त्यातून अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. काम, का्रेध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकार आहेत. हा काम तृप्त झाला नाहीतर क्रोध निर्माण होतो आणि काम तृप्त झाला तर लोभ निर्माण होतो म्हणजे कामातून क्रोध व लोभ निर्माण झाले. काम तृप्त झाला तर लोभ आणि तृप्त नाही झाला तर क्र्रोध निर्माण होतो. तुमच्या इच्छेच्या आड जे येतात ते तुमचे शत्रू होतात. प्रेमविवाह करणार्‍या मुलांच्या प्रेमाच्या आड त्यांचे आईवडिल येतात म्हणून आईवडिल हे त्यांचे शत्रू होतात. आईवडिल परिपक्व असतात कारण त्यांनी अनेक पावसाळे बघितलेले असतात. जीवनांत काय काय समस्या येतात हे सर्व त्यांनी अनुभवलेले असते त्यातून त्यांच्याकडे परिपक्वता येते. ही परिपक्वता मुलांकडे नसते. आपण काय म्हणतो प्रेम आंधळे असते पण तसे नाही तर प्रेम करणारी मुले आंधळी असतात म्हणजे त्यांनी आपली बुद्धी गहाण टाकलेली असते.

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा