मुंबई ः ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे रविवारी निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. 70 व्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका मोठ्या ताकदीने साकारल्या.
सोलापुरातील एका सधन कुटुंबात जन्म झालेल्या शशिकला यांचे बालपण ऐशोआरामात गेले. बालपणापासूनच त्यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. पुढे शशिकला जवळकर लग्नानंतर शशिकला ओमप्रकाश सैगल बनल्या.
शशिकला यांनी नौ दो ग्यारह, कानुन, जंगली, हरियाली और रास्ता, अनपढ, यह रास्ते हैं प्यार के, वक्त, देवर, अनुपमा, नीलकमल, तीन बहुरानियाँ, हमजोली, सरगम, क्रांती, रॉकी, बादशहा, कभी खुशी कभी गम, चोरी चोरी अशा 100 पेक्षा अधिक नावाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारल्या. 2007 साली भारत सरकारने शशिकला यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरविले, तसेच 2009 साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
दरम्यान, 1947 च्या जुगनू चित्रपटात दिलीपकुमार यांच्या बहिणीची भूमिका शशिकला यांनी साकारली. मात्र यानंतर काम मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. 1962 मध्ये आरती चित्रपटात त्यांना नकारात्मक भूमिका मिळाली. या भूमिकेमुळे शशिकला यांनी पुढे कधीच चित्रपटात काम न करण्याचे ठरवले. मात्र चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी शशिकला यांची समजूत काढली. आरती चित्रपटातील खलनायिकेच्या भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हरियाली और रास्ता, गुमराह, हमराही, फुल और पत्थर अशा चित्रपटात खलनायिकेच्या भूमिका त्यांनी साकारल्या. दरम्यान, ओम प्रकाश मेहरा यांच्यासोबत शशिकला यांनी प्रेमविवाह केला. शशिकला यांना दोन मुलीही आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा