दुष्ट प्रवृत्तींवर सज्जनांचा विजय, या चाकोरीतील त्यांचे चित्रपट. वेगळ्या वळणावरील अथवा कलात्मक म्हणता येतील अशा चित्रपटांकडे ते वळले नाहीत. तरीही त्यांच्या प्रत्येक नव्या चित्रपटाची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते.

अभिनेते रजनीकांत यांना भारतीय चित्रपटसृष्टीत अतिशय मानाचा असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रचंड लोकप्रियता, लाखो चाहते आणि चाहत्यांवर कायम राहिलेली जादू ही रजनीकांत यांची वैशिष्ट्ये. चित्रपटसृष्टीतील त्यांचे कर्तृत्व पाहता हा पुरस्कार त्यांना मिळण्यामध्ये आक्षेप असण्याचे कारण नव्हते. मात्र या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी जी वेळ निवडण्यात आली ती चकित करणारी आहे. तामिळनाडून विधानसभेची निवडणूक होत आहे. अशावेळी रजनीकांत यांना पुरस्कार जाहीर होणे हा योगायोग नक्कीच नाही! त्यामागे असलेले राजकारण न सांगता कळण्यासारखे आहे. पुरस्कारासाठी त्यांची निवड करताना ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना पुन्हा एकदा फाळके पुरस्काराने हुलकावणी दिली. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दशके कार्यरत राहिलेल्या अपवादात्मक कलाकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. अशा कलाकारांवर फाळके पुरस्काराची निवड समिती आणखी किती काळ अन्याय करणार? रजनीकांत यांची ख्याती उत्कृष्ट अभिनयासाठी नाही. पण त्यांची संवाद फेक, त्यांच्या लकबी यावर तमाम प्रेक्षक त्यांच्यावर फिदा झाले. ‘थलैवा’ अर्थात नेता हा शब्दप्रयोग रजनीकांत यांच्यासाठी वापरला जातो. या अभिनेत्याने मिळवलेल्या अपार लोकप्रियतेचे वर्णन चमत्कार, या एकाच शब्दात करता येईल. आपल्या हयातीत आख्यायिका बनण्याचे भाग्य त्यांना लाभले.

राजकीय पक्षाचा निर्णय स्थगित

शिवाजी गायकवाड हे रजनीकांत यांचे खरे नाव. एक मराठी व्यक्ती संघर्ष करीत सर्वोच्च स्थानापर्यंत जाते हा मराठी मनाला सुखावणारा भाग. त्यांचे चित्रपट ठराविक साच्याचे असतात. ‘अपूर्व रागंगल’ या 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून रजनीकांत यांचे पदार्पण झाले. विशेष म्हणजे यात कमल हसन मुख्य भूमिकेत होते. प्रारंभी त्यांनी खलनायकाच्याही भूमिका केल्या. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भैरवी’ चित्रपटाने त्यांना सुपरस्टारपद मिळाले. अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या अनेक हिंदी चित्रपटांवरुन दक्षिणेत चित्रपट निघाले. यामध्ये बहुधा रजनीकांत यांचीच प्रमुख भूमिका असे. चांगले दिग्दर्शक मिळण्याच्या बाबतीत रजनीकांत भाग्यवान ठरले. के. बालचंदर यांच्यापासून मणिरत्नम यांच्यापर्यंत अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केले आहे. के. बालचंदर त्यांना गुरुस्थानी आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये रजनीकांत यांचे अनकवेळा दर्शन होते. दक्षिणेत ज्या प्रकारे त्यांच्या नव्या चित्रपटांची उत्सुकता असते तशीच उत्सुकता त्यांच्या नव्या हिंदी चित्रपटाबद्दल दिसते. ‘शिवाजी- दी बॉस’ अथवा ‘काला’ या चित्रपटांच्यावेळी त्याचा प्रत्यय आला. पी. वासू दिग्दर्शित ‘ चंद्रमुखी’ हा त्यांचा चित्रपटदेखील प्रेक्षकप्रिय ठरला. विधानसभेसाठी रजनीकांत राजकीय पक्षाची घोषणा करणार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी तो निर्णय स्थगित केला. आपल्यावर दबाव आणून त्रास देऊ नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी तेव्हाच्या गदारोळानंतर व्यक्त केली होती. असे असले तरी तामिळनाडूच्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव महत्वाचा राहणार आहे. याचे कारण रजनी मक्कळ मंदरम ही त्यांच्या चाहत्यांची भरभक्कम संघटना. या संघटनेची राज्यभर तब्बल 65 हजार केंद्र आहेत. थोडक्यात प्रत्यक्ष निवडणुकीत नसतानाही पडद्याआडून सूत्रे हलविण्याची ताकद रजनीकांत यांच्याकडे आहे. तामिळनाडून शिरकाव करण्यासाठी भाजपला रजनीकांत यांची मदत हवी आहे. निवडणुक न लढवता लोकसेवा करण्याचा रजनीकांत यांचा निर्धार तामिळनाडूत कोणाचे वजन वाढवितो हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. रजनीकांत यांना पुरस्कार देण्यासाठी कोणती वेळ निवडली गेली हा भाग त्यांच्या चाहत्यांसाठी गौण होय. त्यांना रजनीकांत यांच्या चित्रपटांमधून मिळालेल्या उर्जेची तुलना अन्य कशाबरोबरही होऊ शकत नाही! तामिळनाडूला त्यांनी आपली कर्मभूमी मानले. ज्या चित्रपटसृष्टीत शुक्रवारी नवा चित्रपट प्रदर्शित होताना कलाकारांच्या मागणीची गणिते बदलतात अशा क्षेत्रात अनेक दशके पाय रोवून उभे राहणार्‍या जिद्दीचा फाळके पुरस्काराने सन्मान झाला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा