मार्केटयार्डासह शहरातील किराणा दुकानासमोर लगबग
पुणे : शहरात सात दिवस कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र निर्बंधानंतर पुन्हा लॉकडाऊन झाला तर, या भितीने नागरिकांनी किराणा माल भरून ठेवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच मार्केटयार्डातील भुसार विभागात तसेच ठिकठिकाणच्या किराणा दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी झाली होती. परिणामी भुसार विभाग ग्राहकांच्या गर्दीने गजबजला होता.
शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. यास आळा घालण्यासाठी खबरदारी म्हणून सात दिवस कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र निर्बंधानंतरही प्रादुर्भाव न थांबल्यास लॉकडाऊन होऊ शकतो. त्यामुळे नागरिकही ऐनवेळी धावपळ नको म्हणून अधिकचा किराणा माल भरून ठेवत आहेत. त्यामुळेच सकाळपासूनच किराणा मालाच्या दुकानासमोर गर्दी झाल्याचे चित्र शहरात पाहण्यास मिळाले. काही ठिकाणी तर किराणा मालासाठी ग्राहकांनी नंबर लावले होते. तर काही दुकानदारांनी ग्राहकांनी दिलेल्या यादीनुसार किराणा माल तयार करून ठेवत होते.
इतर वेळी मार्केटयार्डातील भुसार विभागात माल खरेदी करणारे किराणा दुकानदार लागेल तसा माल भरत असतात. मात्र काल ग्राहकांची वाढती मागणी पाहून किराणा दुकानदारांनीही अधिकचा माल भरला. त्यामुळे सकाळपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत भुसार विभागात खरेदीची लगबग होती. किराणा दुकानांसमोरही ग्राहकांची गर्दी कायम होती. शहरात निर्बंध लागू करण्यात आले असले तरी शहरातील अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत राहिल, असे दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. एरवी भुसार बाजारातील दुकाने सायंकाळी सातपर्यंत सुरू असतात. निर्बंध लागू केल्यानंतर आता सायंकाळी सहापूर्वीच व्यवहार पार पाडावे लागतील, असे ओस्तवाल यांनी नमूद केले. भुसार बाजारातील सर्व व्यवहार काळजी घेऊन पार पाडण्यात येतील. सर्वांनी नियमांचे पालन गरजेचे आहे. भुसार बाजार सायंकाळी सातपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देणे गरजेचे आहे, असे चेंबरचे सचिव विजय मुथा यांनी सांगितले.
खरेदीदारांची संख्या वाढली
नेहमीच्या तुलनेत 5 टक्क्यापर्यंत खरेदीदारांची संख्या वाढली आहे. मात्र निर्बंध असले, तरी सायंकाळी 6 पर्यंत दुकाने उघडी असणार आहेत. वेळेची मर्यादा आल्याने आलेल्या गाडीतील माल उतरवून घेणे, खरेदी झालेला माल गाडी भरून पाठवून देणे यामुळे व्यापार्‍यांची धावपळ होत आहे. तरी खबरदारी घेऊन आम्ही प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत आहोत. – राजेंद्र बाठिया, घाऊक व्यापारी.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा