हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांचा प्रशासनाला सवाल
पुणे : शहरात एकीकडे खाद्यपदार्थ विक्रीची गाडे, टपर्‍या सुरू आहेत. तेथे नेहमीच्या तुलनेत अधिक गर्दी होत आहे, तर दुसरीकडे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले आहेत. हॉटेल पार्सलसाठी खुली असली, तर त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे निर्बंधामुळे हॉटेल चाकलांची कोंडी झाली आहे. सर्व काही सुरू असताना हॉटेलच बंद का? असा सवाल हॉटेल्स व रेस्टॉरंट चालक उपस्थित करीत आहेत.
शहरातील हॉटेल्स्, रेस्टॉरंट, बार, मॉल आणि मॉलमधील फुड स्टॉल सात दिवस बंद असणार आहेत. पार्सलसाठी हॉटेल्सला मुभा असली, तरी सकाळपासून ते सायंकाळीपर्यंत पार्सल नेणार्‍यांची संख्या खूपच कमी आहे. उलट, कामगारांचा पगार, त्यांच्या खोलीचे भाडे आदी खर्च सुरूच आहे. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी शहरातील हॉटेल्स चालकांची स्थिती आहे. त्यामुळे कडक निर्बंधामुळे हॉटेल्स व रेस्टॉरंट चालक आणखी आर्थिक संकटात सापडणार असल्याची भावनाही ते व्यक्त करीत आहेत.
खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या सुरू असल्याने तेथे प्रचंड गर्दी आहे. इतर अनेक प्रकारची दुकाने सुरू आहेत. बाजारपेठाही सुरूच आहेत. मग हॉटेल, रेस्टॉरंट चालकांवर अन्याय कशासाठी? शेवटी हातगाडीवाल्यापेक्षा हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल, बार चालक विविध प्रकारचा कर भरत असतात. मग प्रमाणिकपणे कर भरणार्‍यांनाच लक्ष का केले गेले? शेवटी आमच्याही गरजा आहेत. आम्हालाही कुटुंब सांभाळायचे आहे. कडक निर्बंधामुळे हॉटेल्स चालक आर्थिक संकटात सांपडली असल्याची भावनाही हॉटेल्स व रेस्टॉरंट चालक व्यक्त करीत आहेत.

हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकावर अन्याय
हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांची आता कुठे घडी बसत होती. कामगार कामावर परतले होते. ग्राहकांची संख्याही काही प्रमाणात वाढली होती. त्यामुळे हॉटेल्स व रेस्टॉरंट चालकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा कडक निर्बंधामुळे नियोजन कोलमडले आहे. पार्सलला मुभा असली, तरी मोजकेच ग्राहक पार्सलसाठी येत आहेत. त्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांची गणिते बिघडली आहेत. आर्थिक बोजाही वाढणार आहे. यावेळी हॉटेल्स चालकांवर अन्याय झाला आहे.
  • किशोर सरपोतदार, सचिव, रेस्टॉरंट अ‍ॅण्ड हॉटेलियर्स असोसिएशन
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा