संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै

लोक कशासाठी भांडतील व दुःखी होतील हे ब्रम्हदेवालाही सांगता येणार नाही. आज घराघरांत महाभारत चाललेले असते. महाभारताचे चित्र घरांत ठेवू नये, ताजमहालचे चित्र घरांत ठेवू नये, अर्जुनकृष्णाचे चित्र असू नये असे लोक म्हणतात. लोकांचा असा समज आहे की महाभारताचे चित्र घरांत असले तर घरांत महाभारत घडेल. महाभारताचे चित्र घरांत नसले तरी घरांत महाभारत चाललेलेच असते. जे हिंदू आहेत त्यांच्या घरात एकवेळ हा फोटो असू शकतो पण जे हिंदू नाहीत त्यांच्याही घरांत महाभारत चाललेले असतेच. सांगायचा मुद्दा असा महाभारत का घडते याचा कुणी विचार करत नाही. कौरवांकडे राज्य होते. पांडवाकडेही राज्य होते. कौरवांनी पांडवांना द्यूत खेळायला बोलावले. द्यूत म्हणजे जुगार. सुईच्या अग्रावर मावेल इतकीसुद्धा जमीन पांडवांना देणार नाही असे दुर्योधन म्हणाला म्हणून महाभारत घडले. सगळे असूनसुद्धा भांडतात. दोन्ही भाऊ शीमंत असले तरी भांडतात. काही कमी नाही तरी भांडतात. पैसा भरपूर आहे तरी दुःख! घरोघरी मातीच्या चुली असे लोक म्हणतात पण घरोघरी मातीच्या चुली का? भांडणतंटे घरात का होतात? जगांत सुख पहाता जवापाडे, दुःख पर्वताएवढे असे का? हे असेच चालायचे हे जीवनविद्येला मान्य नाही. बुद्धी माणसाला देवाने दिलेली आहे. बुद्धीचा सदुपयोग केला तर जगाचे नंदनवन होईल व बुद्धीचा दुरूपयोग केला तर जगाचे वाळवंट होईल. आज शास्त्रज्ञ असे सांगत आहेत की पर्यावरणाचा र्‍हास इतक्या मोठया प्रमाणांत चाललेला आहे की जगाचे वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. माणूस हा प्राणी त्याला कारणीभूत आहे. माणसाला सुखी व्हायचे असेल तर तो सुखी होवू शकतो व त्याला दुःखी व्हायचे असेल तर तो दुःखी होऊ शकतो म्हणून सुखी होणे सोपे व दुःखी होणे कठीण. याला संसार कारणीभूत नाही. याला शहाणपणाचा अभाव हे कारण आहे. ज्या घरांत शहाणपण आहे तिथे सुखच सुख आहे व ज्या घरात शहाणपण नाही तिथे दुःख आहे. शहाणपण कशांत आहे हा प्रश्न आला. आपल्या जीवनांत सर्व काही असूनसुद्धा आपण दुःखी होतो हा आपला दोष आहे. जीवनविद्या सांगते देवाचा विसर पडणे हे सर्व दुःखाचे मूळ आहे व देवाचा आठव हे सर्व सुखाचे फळ आहे म्हणून आठव तो परब्रम्ह व नाठव तो भवभ्रम. आता आठव कुणाचा हा प्रश्न आला. कित्येक लोक नामस्मरण करतात तरी त्यांच्या घरात महाभारत असतेच कारण का? ते नामस्मरण करत नाहीत तर नामजप करतात. नामाचे स्मरण करतात पण देवाचे स्मरण करतच नाहीत. नामस्मरणांत स्मरणाला महत्व आहे व नाम हे स्मरणासाठी आहे.

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा