जीवन अध्यात्म : डॉ. जगन्नाथ श्यामराव पाटील

मन आणि इंद्रिये यांच्यात समन्वय असतो का ? जितेंद्रीय कुणी असतो का ? एखादाच साधु, संत, महात्मा जितेंद्रिय. बाकी इंद्रियांच्या अधिन. मन इंद्रियाला आवरते की इंद्रिये मनाला नियंत्रीत करतात. हा संशोधनाचाच विषय. ज्या इंद्रियांना मन नियंत्रीत करते तेच मन इंद्रियांना वशही होते. उदाहरणार्थ, एका सुंदर स्त्रीकडे आपले लक्ष जाते. पुन्हा वळून पाहायला एक मन विरोध करते; पण लक्ष पुन्हा पुन्हा त्या स्त्रीकडे जाते. तो आदेश डोळ्यांना कोण देतो ? या सगळ्यात आपण मन आणि इंद्रिये या दोहोंवरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. एखादी सवय आपोआप लागत नाही. ती लावावी लागते. बरेच दिवस एखाद्या घरी राहिल्यानंतर घर बदलले तरीही सवयीने इतर विचारांच्या नादात चुकून पाय जुन्या घराकडे घेवून जातात. बर्‍याचदा मन इतर विचारात असताना यांत्रीक पद्धतीने इंद्रिये कार्य करतात. मनात इतर विचार असतात. त्याची साखळी चालू असते. एकीकडे आपण जेवत असतो. दुसरे काहीतरी काम करीत असतो. त्यात आपले लक्ष नसते. एकीकडे विचार. एकीकडे इंद्रियांचे काम. डोळे उघडे पण बर्‍याचदा लक्ष नसते. चालताना पोहोचण्याचे ठिकाण मागे जाते आपण तसेच चालत रहातो. कुणीतरी ‘लक्ष कुणीकडे’ म्हणून विचारतो. शेवटी इंद्रियावर मनाचा आदेश चालतो म्हणावे तर इंद्रिये कमजोर पडल्यावर मनाने कितीही सांगितले तर इंद्रिय काम करीत नाहीत. अशीच परिस्थिती कायम म्हणजे इंद्रिये मजबूत असतानाही ठेवता येईल काय याचा साधकाने विचार करायला हरकत नाही. डोळे कायम ईश्वर दर्शन व सत्य पहाण्यासाठी असावेत. पाय हे तीर्थयात्रा करण्यासाठी, हात पुजा अर्चनेसाठी असावेत. कान हे भजन, प्रवचन, कीर्तन, नामस्मरणासाठी असावे. वाणी ही ईश्वर नामस्मरणासाठी असावी. मन सुद्धा ईशचिंतनासाठीच असावे हेच खरेतर अपेक्षित आहे. इंद्रियांना आध्यात्मीक मार्गासाठी लावणे ही जशी मनाची जबाबदारी तशी इंद्रिये सवयीने आध्यात्मीक कार्यासाठी कार्यरत व्हावीत यासाठीही विशेष प्रयत्न झाले पाहिजेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा